लातूर : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दि. ६ जून रोजी शहरात एका भव्य ‘सायकल रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते. वाढते प्रदूषण रोखणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक उपक्रमात ‘लातूर सायक्लिस्ट ग्रुप’च्या सदस्यांनी आणि महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला. सायकल रॅलीचा शुभारंभ लातूरचे महापौर जयश्रीताई सोनकांबळे आणि लातूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली व स्वत:ही या उपक्रमात सहभाग नोंदवून उपस्थितांचा उत्साह वाढवला.
महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीपासून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. रॅली लातूर शहर महानगरपालिका, महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आर. जे. कॉम्प्लेक्स, औसा रोड येथून यू-टर्न घेउन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक, ५ नंबर चौक येथून यू-टर्न घेउन समारोप लातूर शहर महानगरपालिका कार्यालयात करण्यात आला. पर्यावरण वाचवण्याचा आणि आरोग्याप्रति सजग राहण्याचा संदेश देणा-या या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. लातूरकरांनीही या सायकल रॅलीचे स्वागत करत महानगरपालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाचे मोठे कौतुक केले.
















