मुंबईसह कोकण, विदर्भात मुसळधार, नद्यांना पूर
छ. संभाजीनगर/लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यात मेअखेर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतक-यांनी पेरणी केली. परंतु महिनाभर पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पिके संकटात सापडली होती. परंतु मागच्या २ दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस पडत असून, शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. काही भागांत पावसाचा जोर वाढला. दरम्यान, मुंबई, कोकणासह विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत असून, नद्या, नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढला आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांत शुक्रवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. आज श्रावण महिना सुरू झाला असून, पहिल्याच दिवशी सरीवर सरी कोसळल्याने जनजीवन ठप्प राहिले. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नद्यांना पूर आला असून, धबधबे ओसंडून वाहात आहेत. जालना, बीड, लातूर, धाराशिवमध्येही आज सूर्यदर्शन झालेले नाही. दिवसभर पावसांच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. काही भागांत पावसाचा जोर अधिक असल्याने नदी, नाले वाहू लागले आहेत. नांदेड, परभणी, हिंगोलीतही दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. नांदेड जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. रात्री पावसाचा जोर वाढला होता. परभणीतही दिवसभर पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे सर्वत्र कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला.
विष्णुपुरी प्रकल्प
८४ टक्के भरला
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर होता. त्यामुळे विष्णुपुरीच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्प ८४ टक्के भरला असल्याची माहिती देण्यात आली. त्यातच दिवसभर रिपरिप सुरू राहिली. त्यामुळे वातावरणात गारवा वाढल्याने आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोकणात नद्यांना पूर
कोकणातही धो-धो पाऊस कोसळत असून, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत नद्या दुथडी भरून वाहात आहेत. खेड, दापोलीत जगबुडी नदी धोकादायक पातळीजवळ गेली आहे. खेडमध्ये थेट मटण मार्केटमध्ये पाणी शिरले असून, पावसामुळे वाहतूक खोळंबली आहे. रायगड जिल्ह्यात पाताळगंगा आणि कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली. दरम्यान, मुंबई, ठाण्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. त्यामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली.
विदर्भातही पावसाचे धुमशान
विदर्भातही गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, नद्यांना पूर आला आहे. भंडा-यात शाळा, महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातही आज दिवसभर पाऊस झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
















