परभणी : परभणी ते मानवत महामार्गावर पेडगावच्या पुढे बुधवार, दि.२९ जुलै रोजी रस्त्याच्या कडेला अंदाजे २०-२५ वर्षाची युवती बेशुद्धावस्थेत पडलेली होती. तोंडाला स्कार्फ व अंगावर टॉप होते. वर्दळीच्या रस्त्यावरून शेकडो वाहने येत जात होती. परंतू या युवतीला मदत करावी असा विचारही कोणाच्या मनात आला नाही. परंतू परभणी येथून माजलगावकडे निघालेल्या २ युवकाचे मन रस्त्यावर पडलेल्या युवतीला पाहून हेलावले आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी युवतीस रुग्णालयापर्यंत पोहोचवल्याने तिला जीवदान मिळाले. या २ युवकांच्या कृतीमुळे माणुसकी अजुनही जिवंत आहे हे सिध्द झाले.
या बद्दल सविस्तर माहिती अशी की, परभणी येथील मंगेश सामाले व कृष्णा प्रधान हे माजलगावकडे निघाले होते. परभणी-मानवत महामार्गावरील पेडगावच्या पुढे रस्ताच्या कडेला अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील एक युवती बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. रस्त्यावरून नेहमीप्रमाणे शेकडो वाहने, नागरिक ये-जा करत होते. अनेकांनी हा प्रकार पाहिला मात्र मदतीची भावना कोणातही निर्माण झाली नाही. परंतू सामाले आणि प्रधान यांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतीचा निर्णय घेत माणुसकीची प्रचित इतरांना दिली.
या घटनेसंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना कळविण्यात आले. त्यानंतर तातडीने सूत्रे हलली. युवकांनी ११२ तसेच आणि रुग्णवाहिकेलाही संपर्क केला. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ हालचाल करत काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून युवतीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रवाना केले. वेळेवर मदत मिळाल्याने युवतीवर तातडीने उपचार सुरू करता आले. सामाले आणि प्रधान यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकी व माणुसकीचे परिसरातून कौतूक होत आहे.
















