वेंजाऊ : वृत्तसंस्था
जगातील पहिला बोन ग्लू तयार करण्यात यश आले असून या ग्लूद्वारे तुटलेलं हाड २ ते ३ मिनिटात जोडता येणार आहे. हा बोन ग्लू पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे. जवळपास सहा महिन्यात हा शरिरात विरघळून जातो. यामध्ये मेटल इम्प्लांटची गरज भासत नाही.
चीनमधील वेंजाऊ मधील डॉक्टर लिन यांच्या सहका-यांनी हा बोन ग्लू विकसित केला. आतापर्यंत हा हा ग्लू १५० पेक्षा जास्त रूग्णांवर टेस्ट करून झाला आहे. सध्या तरी या सर्व टेस्टिंगमध्ये सुरक्षित आणि प्रभावी ठरला आहे. हाड तुटणे, फ्रॅक्चर, आर्थोपेडिक सर्जरीमध्ये हा ग्लू एक क्रांती घडवून आणेल.
चीनच्या वैज्ञानिकांनी बोन ०२ अशा नावाचे बायोमटेरियल विकसित केले आहे. हे हाड चिकटवण्यासाठी वापरण्यात येते. समुद्रात चिकटवण्यासाठी वापरण्यात येणा-या पदार्थावरून याची प्रेरणा घेण्यात आली आहे. डॉक्टर लिन जियानफेंग यांना असे आढळून आले की सीप लाटा आणि पाण्याच्या धारेमध्ये देखील हलत नाही. तर रक्ताच्या प्रवाहात हाडांना देखील चिकटवले जाऊ शकते का असा विचार त्यांच्या मनात आला. यानंतर त्यांनी बोन ग्लूची निर्मिती केली. हा ग्लू २०० किलोपेक्षा जास्त वजन पेलण्याची ताकद ठेवतो. शस्त्रक्रियेदरम्यान याचा वापर केला तर तुटलेली हाडे २ ते ३ मिनिटात चिकटवता येतात. यापूर्वी हाडे जोडण्यासाठी धातूचा वापर करण्यात येत होता. हा धातू काढण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागत होती. मात्र आता या बोन ग्लू हा शरीरात ६ महिन्यात विरघळून जातो. त्यामुळे दुस-यांदा शस्त्रक्रिया करण्याची गरज लागत नाही.
















