35.4 C
Latur
Monday, May 13, 2024
HomeUncategorizedमेंदूतील चिपची धमाल

मेंदूतील चिपची धमाल

एलॉन मस्क नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यांसाठी चर्चेत असतो. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असणारा मस्क सध्या आपल्या न्यूरालिंक कंपनीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या कंपनीने मानवी मेंदूमध्ये यशस्वीरीत्या चिप बसवली आहे, यामुळे शरीरावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. माणसांच्या मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर ते अनेक गोष्टी करू शकतील जे ते सामान्यपणे करू शकत नाहीत. अवयवांवर नियंत्रण गमावलेल्या लोकांना चिप इम्प्लांटचा फायदा होऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे. आगामी काळात नागरिकांना संगणक किंवा मोबाईल वापरण्यासाठी बोलण्याची गरज देखील भासणार नाही, असे भाकित एलॉन मस्कने केले आहे.

विज्ञान आपल्याला सतत आश्चर्याचा धक्का देते. विज्ञानाचे चमत्कार आपण यापूर्वी पाहिले आणि पुढेही पाहत राहू. विज्ञानातील नवनवीन शोध आणि संशोधनामुळे मानवी जीवन सुलभ होण्यास हातभार लागला आहे आणि जगही बदलले आहे. शास्त्रीय शोध हे मानवी जीवनाला वरदान ठरले आहेत. अर्थात आगामी काळात असे बदल होणार आहेत की त्याचा काही दशकांपूर्वी विचार केला नव्हता. त्यापैकीच एक म्हणजे ‘न्यूरल चिप’चे मानवी मेंदूतील प्रत्यारोपण होय. आतापर्यंत आपण संगणक, लॅपटॉप आणि अँड्रॉईड फोनची मदत घेऊन व्यवहार करत होतो. मात्र ही सर्व कामे नाण्यासारखे दिसणा-या एका उपकरणाच्या मदतीने म्हणजेच ‘न्यूरल चिप’ने करता येणार आहेत. न्यूरल चिप हे मेंदूला जोडल्यानंतर माणसाचे काम अधिक सुस होणार आहे. ही कमाल एलॉन मस्कच्या कंपनीने केली आहे. नाण्याएवढे हे यंत्र एका चुटकीसरशी मेंदूचा अविभाज्य घटक होईल. अर्थात ते कोठे बसविले हे संबंधित माणसाला कळणार देखील नाही. यापूर्वी मानवी मेंदूत चिप बसविली जाईल, असे म्हटले जात होते. मात्र एलॉन मस्कच्या कंपनीने ही गोष्ट सिद्ध करून दाखविली आहे.

एलॉन मस्कच्या स्टार्टअप न्यूरालिंकने मानवी मेंदूत यशस्वीपणे चिप बसविल्याची बातमी अलीकडेच आली आणि जगभरात चर्चेला उधाण आले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाने नुसता विचार जरी केला तरी अनेक यंत्रे कार्यान्वित होऊ शकतील. एलॉन मस्क यांच्यासोबत सात वैज्ञानिकांच्या टीमने २०१६ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये न्यूरालिंक कंपनीची स्थापना केली. न्यूरालिंककडे ४०० हून अधिक कर्मचारी आहेत. न्यूरालिंकने मानवी मेंदूची शस्त्रक्रिया करून ही बहुपयोगी चिप बसविली आहे. हे यंत्र मानवी मेंदू आणि संगणक यांच्यातील संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. मानवावरचा प्रयोग यशस्वी राहिला आणि तो अनियंत्रित झाला नाही किंवा चिपचे काही दुष्परिणाम समोर आले नाहीत तर नक्कीच जगाचा कायापालट होईल, असा मस्क यांचा दावा आहे. मस्क यांच्या या चिपमुळे दृष्टिदोष असणारे लोक जग पाहू शकतील, कमकुवत विचारशक्ती असणारे लोक विद्वान म्हणून समोर येतील, अर्धांगवायू पीडित रुग्ण सहजपणे फिरू शकतील आणि ते संगणकाची हाताळणी करू शकतील. कंपनीने या चिपचे नाव ‘लिंक’ असे ठेवले आहे.

सप्टेंबर २०२३ मध्ये मस्कच्या कंपनीला मानवावर प्रयोग करण्याची परवानगी मिळाली. न्यूरालिंकच्या मते, प्रयोग किंवा चाचणीसाठी सर्वाईकल स्पायनल कॉर्डला मार लागलेली व्यक्ती किंवा क्वाड्रिप्लोझिया असलेल्या व्यक्तीची निवड करण्यात आली. या चाचणीत सहभागी होणा-या व्यक्तीचे वय किमान २२ असणे गृहित धरले होते. वास्तविक या चाचणीतून ठोस निष्कर्ष काढण्यासाठी आणखी सहा वर्षे लागू शकतात, असा अंदाज आहे. एलॉन मस्कच्या नियोजनानुसार, ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसची रचना केली जात असून त्यानुसार त्याचे प्रत्यारोपण करून त्याचा मेंदूच्या नैसर्गिक कार्यात आणि तत्त्वांशी मेळ बसवला जाईल. या चिपमध्ये कोणतेही संगणक किंवा मोबाईल यास सहजपणे हाताळण्याची क्षमता असेल. आगामी काळात नागरिकांना संगणक किंवा मोबाईल वापरण्यासाठी बोलण्याची गरज देखील भासणार नाही, असे भाकित एलॉन मस्कने केले आहे. काहींना वाटते की हे यंत्र सूचनेनुसार काम करू शकेल. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास टेलिपॅथी म्हणजेच मेंदूच्या विचारशक्तीच्या आधारे सहजपणे स्मार्टफोन आणि संगणकाला हाताळता येणार आहे.

या चिपच्या मदतीने आपण अनेक आठवणी सहजपणे साठवू शकतो का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. एलॉन मस्कने गेल्यावर्षी केलेल्या दाव्यानुसार, न्यूरलचिप ही स्मार्टफोनमधील बॅकअप मेमरीप्रमाणे लोकांच्या आठवणी साठवून ठेवण्यास मदत करेल. यानुसार लोकांची स्मरणशक्ती देखील वाढेल. अर्थात या चिपमुळे दुरुपयोगाची शक्यता देखील अधिक आहे. एखाद्या विद्यार्थ्याला चिप दिली तर तो अभ्यासच करणार नाही आणि परीक्षेचा संदर्भच बदलून जाईल. एखाद्या गुन्हेगाराच्या हाती चिप लागली तर तो किती गंभीर गुन्हे करू शकतो, याची कल्पनाच न केलेली बरी. मात्र पोलिसांना या चिपचा चांगला लाभ मिळू शकतो आणि भविष्यात आरोपी वाचण्याची शक्यता राहणार नाही. या चिपची चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रत्येकालाच ही चिप हवीहवीशी वाटणार आहे. आपल्या जुन्या चांगल्या आठवणी लक्षात ठेवाव्या असे कोणाला वाटणार नाही? स्मृतिभ्रंशासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी या चिपची मदत मिळणार आहे. त्यामुळे न्यूरलचिप ही जगभरातील लाखो लोकांसाठी वरदान ठरू शकते.

मस्क हे मानवी मेंदूत कॉम्प्युटर इंटरफेस रोपण करून मानव आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्सला जोडण्याची इच्छा बाळगून आहेत. न्यूरालिंकने यापूर्वी माकडांवर चाचणी केली आणि चिप चांगल्या रीतीने काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही चिप बसवणे अणि बाहेर काढणे अत्यंत सोपे आहे. एलॉन मस्क यांनी ९ एप्रिल २०२१ रोजी न्यूरालिंकच्या या चिपच्या मदतीने माकड सहजपणे पोंग नावाचा ऑर्किड गेम खेळण्याचे शिकले, असे सांगितले होते. अर्थात ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली तर मनुष्यप्राणी एकाहून एक विक्रम नोंदविण्यात सक्षम होईल. एलॉन मस्क यांच्या महत्त्वाकांक्षा मानवी क्षमतेच्या सुपरचार्जिंगशी देखील संबंधित आहेत. एएलएस किंवा पार्किन्सन्ससारख्या मज्जासंस्थेसंबंधीच्या विकारांवर उपचार केल्यानंतर, मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील चांगले संबंध साधण्याची कल्पना या चिपच्या आविष्कारातून एक दिवस पूर्ण होऊ शकते.

-महेश कोळी, संगणक अभियंता

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR