41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयघोडेबाजार टळला!

घोडेबाजार टळला!

ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना काँग्रेसमधून फोडून काँग्रेसला जोरदार धक्का दिल्यानंतर भाजप या निवडणुकीत चौथा उमेदवार उतरवून राज्यातील काँग्रेस, शरद पवारांचा गट व उद्धव ठाकरे यांच्या गटात फोडाफोडीचे राजकारण करणार असाच बहुतांश राजकीय निरीक्षकांचा व जाणकारांचा कयास होता. कारण मागच्या काही वर्षांतील भाजपची हीच कार्यशैली राहिलेली आहे. मात्र, भाजपने अशोकरावांना राज्यसभेची उमेदवारी बहाल करताना चौथा उमेदवार रिंगणात न उतरवण्याचा निर्णय घेऊन राजकीय वर्तुळाला जोरदार आश्चर्याचा धक्काच दिला आहे. खरे तर अशोकरावांना उमेदवारी देताना काँगे्रसमध्ये घाऊक फूट पाडण्याची अट त्यांना घातली जाईल असाच एकंदर अंदाज होता. मात्र, भाजपने आश्चर्यकारकरीत्या तह करून राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.

भाजपच्या या खेळीमागे तूर्त राज्यात नवा राजकीय संघर्ष नको, ही सद्भावना आहे की, काँग्रेसला गाफिल करून मोठा दणका देण्याची ही पूर्वतयारी आहे? अशी शंका या निमित्ताने उपस्थित झाली आहे. या शंकेचे निरसन येत्या काळात होईलच! मात्र, तूर्त राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा घोडेबाजार टळला याचाच आनंद आहे. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता भाजप-१०४, राष्ट्रवादी (अजित पवार गट)-४२, शिवसेना (एकनाथ शिंदे गट)-३९, काँग्रेस-४३, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)-१६, राष्ट्रवादी (शरद पवार गट)-११, बहुजन विकास आघाडी-३, सपा, एमआयएम, प्रहार जनशक्ती- प्रत्येकी २, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष- प्रत्येकी एक व अपक्ष-१३ अशी स्थिती आहे. त्यामुळे सध्या राज्यसभेच्या रिंगणात उतरलेले सर्वच पक्षांचे सहाही उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट आहे. तसे पाहिले तर राज्यातील महाविकास आघाडी सातवा उमेदवार रिंगणात उतरवून या निवडणुकीत ‘ट्विस्ट’ आणू शकली असती, कारण सद्यस्थितीत महाविकास आघाडीकडे जवळपास २५ अतिरिक्त मते आहेत.

आघाडीचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी केवळ १५ मतांची जुळवाजुळव करावी लागली असती. त्या तुलनेत आपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला किमान २५ ते २६ मतांची फोडाफोडी करावी लागली असती. भाजपला हा खेळ जमण्याची खात्री नसावी त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उगाच हात दाखवून अवलक्षण नको, असा विचार भाजप नेतृत्वाने केला असेल. तर सत्ताधा-यांसोबत असलेले अपक्ष फुटण्याची शक्यता खूपच कमी असते हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीनेही आपला दुसरा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा विचार सोडून दिला असावा. त्यामुळे मध्यंतरी छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याची संजय राऊत यांनी सुरू केलेली व शरद पवारांनी पाठिंबा व्यक्त केलेली चर्चा आता हवेत विरली आहे. काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांची उमेदवारी जाहीर करून सगळ्या चर्चेला पूर्णविराम लावला.

या स्थितीमुळे कदाचित ही तहाची स्थिती उत्पन्न झाली असेल! असो!! भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसनही पुन्हा केवळ चर्चेत राहिले आहे. तर केंद्रीय मंत्री असणा-या नारायण राणेंना उमेदवारी नाकारून भाजपने त्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवले जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अशोकरावांना प्रवेशाबरोबर उमेदवारी मिळाल्याचे समाधान असले तरी त्यांना राज्यातल्या त्यांच्या महत्त्वाकांक्षांवर पाणी सोडावे लागणार व ज्योतिरादित्य शिंदेंच्या वाटेनेच भाजपमधला प्रवास गोड मानून घ्यावा लागणार हे स्पष्ट झाले आहे. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांना त्यांच्या निष्ठेचे फळ देतानाच पुणे मतदारसंघातील पारंपरिक ब्राह्मण मतदारांना पुन्हा जवळ करण्याचा हेतू ठेवला आहे. शिवाय लोकसभा व विधानसभेसाठीचा या मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदारकीची सव्वा चार वर्षे शिल्लक असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांनाच उमेदवारी जाहीर केल्यावरून जोरदार आश्चर्य व्यक्त होत असले तरी त्यामागे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्रतेबाबत येऊ शकणा-या संभाव्य निर्णयाची भीती दिसते! सध्या अजित पवार गटाकडे दोनच खासदार आहेत.

त्यामुळे अपात्रता प्रकरणात ते दोघेही अपात्र ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. लोकसभेचा कार्यकाळ संपत आलेला असल्याने अपात्र ठरले तरी सुनील तटकरे यांच्यावर फारसा फरक पडत नाही. मात्र, प्रफुल्ल पटेल अडचणीत सापडू शकतात. ही टांगती तलवार दूर करण्यासाठीच पटेलांना उमेदवारी देण्यात आल्याचा अजित पवार गटाचा दावा आहे. तथापि, पटेलांना उमेदवारी देण्यामागे पार्थ पवार यांच्या महत्त्वाकांक्षेला लगाम घालणे व घराणेशाहीचा शिक्का माथी बसू न देणे, हा ही विचार अजित पवारांनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदेडचेच असणारे डॉ. अजित गोपछडे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने आता नांदेड जिल्ह्याला तीन खासदार मिळाले आहेत. या निर्णयामागे गोपछडे यांच्या माध्यमातून मराठवाड्यात निर्णायक ठरू शकतील अशा संख्येने असणा-या लिंगायत मतदारांना चुचकारण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो आहे. तर विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच पुन्हा नांदेड लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्याचा भाजपचा विचार असल्याचे स्पष्ट होते. शिवसेनेच्या शिंदे गटाने मात्र अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमधून आलेले दिग्गज नेते मिलिंद देवरा यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. देवरांना राज्यसभा मिळाल्याने आता दक्षिण मुंबईचा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येईल, हे स्पष्ट झाले आहे.

राज्यातले नारायण राणे, मुरलीधरन, प्रकाश जावडेकर(भाजप), कुमार केतकर(काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी) हे सहा सदस्य येत्या २ एप्रिलला निवृत्त होत आहेत. त्यापैकी एकाही खासदाराला पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही, हे आणखी एक वैशिष्ट्य! शरद पवार गट व उद्धव ठाकरे गट यांच्याकडे उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळच नसल्याने ते उमेदवार देऊ शकत नाहीत तर काँग्रेसने हंडोरे यांना उमेदवारी देऊन विधान परिषदेत त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. एकंदर काँगे्रसमधून अशोकरावांना फोडल्यावर व शिंदे आणि पवार सोबत असतानाही भाजपने शक्तिप्रदर्शनाचा मोह प्रयत्नपूर्वक टाळून चौथा उमेदवार न दिल्याने राज्यातील राज्यसभा निवडणूक घोडेबाजाराशिवाय बिनविरोध पार पडणार हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR