Homeसंपादकीययंदा पाऊस रुसणार!

यंदा पाऊस रुसणार!

देशातील कोट्यवधी शेतक-यांसह संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लक्ष लागून राहिलेल्या नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी जाहीर केला. यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हे प्रमाण ‘सामान्यपेक्षा कमी’ या श्रेणीत येते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ.एम. मोहपात्रा यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’ या हवामान स्थितीचे सावट राहण्याची शक्यता आहे. डॉ. मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर या काळात ‘एल निनो’ची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची भीती आहे. दिलासादायक बाब म्हणजे, याच काळात हिंदी महासागरात ‘इंडियन ओशन डायपोल’ सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. हा सकारात्मक आयओडी ‘एल निनो’च्या नकारात्मक प्रभावाला रोखण्यास मदत करतो, त्यामुळे पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघू शकते. जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाची स्थिती सुरुवातीला सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. खासगी हवामान संस्थांनी यापूर्वीच मान्सून कमकुवत राहण्याचे संकेत दिले होते. त्यावर आता सरकारी मोहर उमटली आहे. पावसाचे प्रमाण ९२ टक्के राहिल्यास शेतीकामांचे नियोजन, पेरण्या आणि पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून असल्याने, हा अंदाज धोरणकर्त्यांसाठी आणि शेतक-यांसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात विशेषत: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात, नेहमीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण विभाग तसेच विदर्भातील काही भागात ब-यापैकी पाऊस राहील. सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

जुलै ते सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहू शकते. मान्सूनच्या दुस-या टप्प्यात ‘एल निनो’चा प्रभाव कमी होऊन चांगला पाऊस होऊ शकतो. सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतक-यांनी खरीप पेरणी करताना मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होणा-या सुधारित अंदाजाची वाट पाहावी. यंदा मान्सूनचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे हा धोका निर्माण झाला आहे. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणे हे शेतक-यांसाठी चिंताजनक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाचा पाऊस हा ‘सामान्य’ श्रेणीच्या खाली राहण्याची चिन्हे आहेत. दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साधारणपणे ९६ ते १०४ टक्के पाऊस हा ‘सामान्य’ मानला जातो. मात्र यंदा हा आकडा ९२ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने चिंतेचे वातावरण आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी होण्यामागे ‘एल निनो’ हा प्रमुख घटक असल्याचे सांगितले जात आहे. प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात होणा-या वाढीमुळे भारतीय मान्सूनच्या वा-यांवर प्रतिकूल परिणाम होतो.

यामुळे पावसाचे वितरण विस्कळीत होण्याची आणि पावसाचे दिवस कमी होण्याची भीती असते. भारतातील ६० टक्क्यांहून अधिक शेती आजही पावसावर अवलंबून आहे. पावसाने ओढ दिल्यास या क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. आयएमडीच्या मते, पावसाचे ९२ टक्के प्रमाण देशभरात सर्वत्र सारखे नसेल. काही राज्यांमध्ये पावसाची स्थिती ब-यापैकी असेल, तर मध्य आणि दक्षिण भारतात पावसाची तूट अधिक जाणवण्याची शक्यता आहे. हवामान विभाग लवकरच विभागवार पावसाचा सविस्तर अंदाज जाहीर करणार आहे. हा प्राथमिक अंदाज असून, जून ते सप्टेंबर या काळात एल निनोची तीव्रता किती राहते, यावर मान्सूनचे भवितव्य अवलंबून असेल. सरकार आणि कृषी विभागाने शेतक-यांना या स्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुस-या श्रेणीत ९० ते ९५ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तिस-या श्रेणीत ९६ ते १०४ टक्के म्हणजे सामान्य सरासरीइतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०५ ते ११० टक्के आणि ११० टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.

एल निनोचा परिणाम यंदा मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. २०२६ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील असे स्कायमेटने म्हटले आहे. जून महिन्यात मान्सून तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता असली तरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. भारतातील एकूण वार्षिक पावसाच्या सुमारे ७० टक्के पाऊस जून ते सप्टेंबर दरम्यान पडणा-या दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे पडतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा असलेल्या कृषी क्षेत्रासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या जून-जुलै महिन्यात होत असल्याने मान्सूनचे वेळेवर आगमन आणि त्याचे वितरण महत्त्वाचे ठरते. साधारणपणे दक्षिण-पश्चिम मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि १५ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. अमेरिकेतील काही हवामानतज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा सुपर एल निनो म्हणजे अधिक शक्तिशाली एल निनो तयार होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम २०२६च्या उत्तरार्धात दिसू शकतात. दरवर्षी उन्हाळ्यात भारतात तापमान वाढत जाते, त्यातून वा-यांची दिशा बदलते आणि मान्सूनची निर्मिती होते. मान्सून येण्याआधीच्या काळातल्या या उष्णतेच्या लाटांची तीव्रता यंदा जास्त जाणवू शकते.

जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा मान्सून शेतीसोबतच नद्या, धरणे, तलाव, विहिरी भरण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्रात सरासरीच्या ९० ते ९५ टक्के पाऊस पडण्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पेरण्यांच्या नियोजनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे यंदा जलसाठ्यांचे नियोजन आणि पिकांची निवड करताना शेतक-यांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. जुलै-ऑगस्ट दरम्यान पावसाची स्थिती कशी राहते, यावर खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून असेल. राज्यात सध्या बहुतेक ठिकाणी तापमानाने चाळीशी पार केली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आजार वाढले जाण्याची शक्यता आहे. आगामी पाच दिवसांत राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR