चेन्नई : वृत्तसंस्था
आयपीएलच्या २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केले आहे. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना १९२ धावा केल्या होत्या. विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरला विजय मिळवता आला नाही. केकेआरने २० ओव्हरमध्ये ७ बाद १६० केल्या. चेन्नईने केकेआरला पराभूत करत दुसरा विजय मिळवला. चेन्नईने कोलकाता नाइट रायडर्सवर ३२ धावांनी विजय मिळवला.
कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने चेपॉकवर टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचा संघ पहिल्यांदा फलंदाजीला चेन्नईचा कॅप्टन ६ बॉलमध्ये ७ धावा करुन बाद झाला. यानंतर संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे यांनी चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आयुष म्हात्रेने ३८ धावा केल्या. यानंतर संजू सॅमसन ३८ धावा करून बाद झाला. सरफराज खान आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी चेन्नईचा डाव सावरला. मात्र, त्यांचा संघ २०० धावांचा टप्पा पार करु शकला नाही. चेन्नईने २० ओव्हरमध्ये ५ बाद १९२ धावा केल्या. केकेआरकडून कार्तिक त्यागीने ३५ धावा देत २ विकेट घेतल्या. सुनील नरेन याने एक विकेट घेतली. वैभव अरोरा केकेआरचा सर्वांत महागडा गोलंदाज ठरला. कॅमेरून ग्रीन याने २ ओव्हर गोलंदाजी केली. त्याने ३० धावा दिल्या.
कोलकाता नाईट रायडर्सने आज फलंदाजी क्रमात बदल केले. मात्र, बदल करूनदेखील त्यांना यश आले नाही. फिन एलन आणि सुनील नारायण यांनी केकेआरच्या डावाची सुरुवात केली. फिन एलन १ रन करुन बाद झाला. सुनील नरेन याने २४ धावा केल्या. सुनील नरेन याने २४, अजिंक्य रहाणे २८, अंगकृष रघुवंशी याने २७ धावा केल्या. मात्र, या तिघांना चांगली सुरुवात मिळूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यामुळे त्यांचा पराभव झाला तर रिंकू सिंग ६ धावा करु शकला तर कॅमेरुन ग्रीनला भोपळादेखील फोडता आला नाही. रोवमॅन पॉवेल आणि रमणदीप यांनी अनुक्रमे ३१ आणि ३५ धावा करु शकले. मात्र, ते केकेआरला विजयापर्यंत पोहोचवू शकले नाहीत. कोलकाता चौथ्या पराभवामुळे गुणतालिकेत तळाला पोहोचले आहेत.

