Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीतील संघर्ष विकोपाला पक्ष फुटीच्या मार्गावर

राष्ट्रवादीतील संघर्ष विकोपाला पक्ष फुटीच्या मार्गावर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पक्षांतर्गत संघर्ष विकोपाला गेला असून, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. हा प्रकार उघडकीस येताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तांत्रिक चुका झाल्याची सावरासारव केली असली तरी त्यातून पार्थ पवार यांनी पटेल यांचे पंख कापल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची व पदाधिका-यांना वाटप करण्यात आलेल्या कामांची यादी प्रसिद्ध झाली. त्यात प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश नव्हता. राष्ट्रवादीतील या घडामोडींनंतर पक्षांतर्गत वाद विकोपास गेला. यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘एक्स’ समाज माध्यमातून सावरासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘पक्षाच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत काही प्रशासकीय चुका झाल्या असून, थोड्याच वेळात ही चूक दुरुस्त केली जाईल, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले होते. यानुसार पक्षाने नवीन यादी प्रसिद्धीस दिली. त्यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे व दिलीप वळसे-पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्यापुढे राज्यसभेतील नेते एवढाच उल्लेख आहे. म्हणजेच पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या पदावर आता नाहीत. तटकरे हे लोकसभेतील नेते दाखविण्यात आले आहेत. कार्यकारिणीत पार्थ पवार व जय पवार यांचा समावेश आहे. यावरून प्रफुल्ल पटेल यांचे पंख छाटण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीतील नेतृत्वाचा वाद समोर आला. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यावर निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या पत्रात २८ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील पत्रव्यवहार ग्रा धरू नये, अशी सूचना करण्यात आली होती. याचाच अर्थ पटेल व तटकरे यांनी केलेला पत्रव्यवहार ग्रा धरू नये, असेच सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते. तेव्हापासूनच राष्ट्रवादीतील वाद वाढू लागला आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत पटेल, तटकरे, भुजबळ, वळसे-पाटील या जुन्याजाणत्या नेत्यांना स्थान देण्यात आले नव्हते. पार्थ पवार यांनी पक्षावर पकड बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यांना पटेल व तटकरे यांचे पक्षातील वर्चस्व मोडून काढायचे आहे असेच एकूण त्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसते. पवार कुटुंबियांना दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांचे विलीनीकरण व्हावे, अशी इच्छा आहे. तसे संकेत उभय बाजूने देण्यात आले आहेत. पटेल व तटकरे यांचा शरद पवार गटाच्या विलीनीकरणास सक्त विरोध आहे. हा वाद असाच आणखी विकोपाला गेल्यास राष्ट्रवादीतील फूट अटळ असल्याचे मानले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR