Homeराष्ट्रीयनीट परीक्षा रद्द, २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

नीट परीक्षा रद्द, २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

केंद्राचा निर्णय, सावळागोंधळ पुन्हा चव्हाट्यावर, देशभरातून तीव्र संताप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील १० वी आणि १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून १० वीनंतर अनेकांनी नीट परीक्षेची तयारी सुरू केली तर १२ वीच्या परीक्षेनंतर कित्येक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, नीटची परीक्षा होऊन १० दिवसही उलटत नाहीत, तोच केंद्र सरकारने ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द केली. पेपर फुटल्याची बाब समोर आल्याने केंद्राने हा निर्णय घेतला. आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. देशातील तब्बल २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला.

देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, देशभरात ४२ तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून नीट परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात एनटीएने म्हटले की, ८ मे रोजी हे प्रकरण पडताळणीसाठी केंद्रीय यंत्रणाकडे सोपविण्यात आले. तपास यंत्रणांकडून मिळालेली माहिती आणि अहवालाच्या आधारे परीक्षा रद्द करण्याचा कठीण निर्णय घेण्यात आला.

देशभरात गेल्याच आठवड्यात म्हणजे ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने केलेल्या तपासात परीक्षेच्या तब्बल ४२ तास आधीच प्रश्नपत्रिका टेलिग्राम आणि व्हॉटसअ‍ॅपवर फिरत असल्याचे समोर आले. या प्रकरणी आतापर्यंत १३ संशयितांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर नीटची परीक्षा रद्द करण्यात आली. आता या पेपरफुटीची सीबीआयमार्फत चौकशी होणार आहे.

या निर्णयाचा सर्वाधिक फटका मागील दोन वर्षांपासून मेहनत घेणा-या विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत कठीण आर्थिक आणि मानसिक परिस्थितीतून नीटची तयारी केली होती. परीक्षा चांगली गेल्याने चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र, अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे. खेडेगावातील विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण ठरत आहे. पुन्हा शहरात जाऊन राहणे, हॉस्टेलचा खर्च करणे, क्लासेस किंवा टेस्ट सिरीज जॉईन करणे, यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे.

नाशिकमधून पेपर फुटला!
नाशिकमधून नीट परीक्षेचा पहिला पेपर फुटला. येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेने ३० वर्षीय संशयित शुभम खैरनार याला बेड्या ठोकल्या. ओळख लपवण्यासाठी त्याने चक्क टक्कल केले होते. मात्र नाशिक पोलिसांच्या नजरेतून तो सुटला नाही.

पेपरफुटीत लातूर कनेक्शन?
पेपरफुटी प्रकरणात नाशिकनंतर लातूरचे नाव चर्चेत आले आहे. एका विद्यार्थिनीच्या पालकाने यासंबंधी पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिल्याने लातूर येथील एका खासगी क्लासेसची चौकशी सुरू केली. मॉक टेस्टमध्ये दिलेले तब्बल ४२ प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला. आज पोलिस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून याबाबत लेखी तक्रार दिली. या तक्रारीत परीक्षेपूर्वी खासगी क्लासेसने दिलेल्या मॉक टेस्टमधील ४२ प्रश्न नीट-२०२६ च्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेत आल्याचा दावा केला आहे. त्यानंतर पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी समरजीत साळवे यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले.

सीबीआयमार्फत चौकशी
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने आरोपांच्या सखोल चौकशीसाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीए विभागाला पूर्ण सहकार्य करेल आणि चौकशीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य, नोंदी दिल्या जातील, असे एनटीएतर्फे सांगण्यात आले.

पीडीएफद्वारे सर्वत्र लीक
नीटचा पेपर पीडीएफ स्वरूपात व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून देशभर पसरवण्यात आल्याचा संशय आहे. संशयास्पद सॅम्पल पेपर नेमका कोठून आला, याचा तांत्रिक तपास आता सुरू झाला आहे.

परीक्षेची नवीन
तारीख लवकरच
३ मे २०२६ रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली असून, आता नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, असे सांगण्यात आले.
परीक्षा केंद्र तेच
परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र ३ मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही.
नवे ओळखपत्र मिळणार
नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहेत. विद्यार्थी, पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR