किल्लारी : महेश उस्तुरे
महा प्रलयकारी भूकपाने उद्ध्वस्त झालेल्या किल्लारी व परीसरातील गावाचे पुनर्वसनानंतर आता दि. २३ मे पासून किल्लारी व परिसरातील गावाचे अध्यात्मिक पुर्नवसन होणार आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे पूजनीय राष्ट्रसंत परम पूज्य श्री मोरारी बापू यांच्या श्रीमुखातून रामकथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पावन रामकथा महोत्सव दि २३ मे ते ३१ मे २०२६ दरम्यान होणार आहे.
श्री नीलकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., किल्लारी, ता. औसा येथील प्रांगणात ही रामकथा आयोजित करण्यात आली आहे. १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपानंतर पूजनीय मोरारी बापूंनी किल्लारी येथे भूकंपग्रस्त लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी, समाजाला आध्यात्मिक आधार व आत्मविश्वास देण्यासाठी रामकथेचे आयोजन केले होते. स्थानिक नागरिकांच्या आग्रहाने त्याच काळात बापूंनी आपल्या मनातील रामचरितमानसाच्या भावनेतून साकारलेल्या भगवान श्रीराम, लक्ष्मण व माता सीता यांच्या मूर्ती किल्लारीला समर्पित करून तेथे राममंदिराची स्थापना केली होती . या पावन स्वरूपांची पूजनीय बापूंनी स्वत: २५ वर्ष सेवा केली होती. त्या राममंदिर येथे पुन्हा एकदा रामकथेचे आयोजन होत असून, हा संपूर्ण परिसरासाठी अत्यंत भावनिक, आध्यात्मिक व ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
या रामकथा महोत्सवात देश-विदेशातून दररोज अंदाजे १०, ००० ते १५,००० रामभक्त व श्रद्धाळू भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून कथा परिसरात भक्तांसाठी बैठक व्यवस्था, प्रसाद (भोजन) व्यवस्था, पार्किंग, स्वच्छता तसेच विविध सेवा सुविधांची व्यापक तयारी करण्यात येत आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन या पावन आयोजनासाठी स्थानिक प्रशासन अत्यंत सकारात्मक सहकार्य करीत असल्याचे दिसत आहे. संपूर्ण परिसरात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
१५ ते २० हजार भाविकांसाठी सोय
या रामकथेची सुरवात दि २३ मे पासून ३१ मेपर्यंत राहणार आहे. २३ मे रोजी सायं. ४ वाजता कथा सुरुवात होईल तर २४ मे ते ३१ मे दररोज सकाळी १० ते दुपारी १. ३० वाजेपर्यंत रामकथा राहणार आहे. या कथेसाठी १५ ते २० हजार भाविकाना कथा बसून ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरुन आलेल्या भाविक भक्तांना राहाण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील भक्तांना राहाण्यासाठी मंगलकार्यालय सोय करण्यात आली आहे. आनेक स्वयसेवक, भक्तगण किल्लारीत दाखल झाले आहेत. रामकथा आयोजन समितीने सर्व रामभक्त, श्रद्धाळू व नागरिकांना या पावन रामकथा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे
















