Homeमुख्य बातम्यालग्न हे शारिरीक संतुष्टीचे माध्यम नव्हे, समाजाचे महत्वाचे युनिट! लिव्ह-इन रिलेशनशिपवर भागवत यांचे भाष्य

लग्न हे शारिरीक संतुष्टीचे माध्यम नव्हे, समाजाचे महत्वाचे युनिट! लिव्ह-इन रिलेशनशिपवर भागवत यांचे भाष्य

नागपूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप, लग्नाचे वय तसेच, देशाच्या लोकसंख्या धोरणासंदर्भात मोठे आणि महत्वाचे विधान केले आहे. ‘कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नाही, तर ते समाजाचे एक महत्त्वाचे युनिट आहे. जर तुम्ही जबाबदारी घेण्यास तयार नसाल, तर ते योग्य नाही’, अशा शब्दांत भागवत यांनी लिव्ह-इन संस्कृतीसंदर्भात भाष्य केले.

भागवत म्हणाले, कुटूंबच आपल्याला समाजात कसे रहावे, हे शिकवते. हे सर्व आपला देश, समाज आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवण्याचे साधन आहे. जर आपली लग्न करण्याची इच्छा नसेल, तर ठीक आहे. आपण संन्यासी होऊ शकता. मात्र, आपण तेही होणार नसला तर, जबाबदारी घेणार नसाल, तर कसे चालेल?

लोकसंख्याशास्त्राचा दाखला देत ते म्हणाले की, जर जन्मदर २.१ च्या खाली गेला तर तो समाजासाठी धोकादायक ठरतो. सध्या बिहारमुळे आपला दर २.१ वर असून अन्य राज्यांत तो १.९ पर्यंत खाली आला आहे. लोकसंख्या हे केवळ ओझे नसून ती एक प्रकारची संपत्तीही आहे. प्रभावी लोकसंख्या धोरण बनवणे आवश्यक आहे. देशाचे पर्यावरण, पायाभूत सुविधा, महिलांचे आरोग्य आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या अंदाजावर आधारित सर्वसमावेशक धोरण आखले जायला हवे. मी स्वत: अविवाहित प्रचारक असल्याने मला यातील तांत्रिक माहिती नाही, मात्र तज्ज्ञांकडून मिळालेली ही माहिती समाजाच्या हितासाठी महत्त्वाची आहे, असेही भागवत यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR