तेहरान/वॉशिंग्टन: स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजेच होर्मुझची खाडी या जगातील अत्यंत महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गावर अमेरिका आणि इराणमधील तणाव कमालीचा वाढला आहे. अमेरिकन लष्कराने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या कशम बेट, बंदर अब्बास आणि जास्क या अत्यंत मोक्याच्या लष्करी तळांवर आणि बंदरांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेने केलेल्या या बॉम्बवर्षावामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले असून परिस्थिती गंभीर बनली आहे.
अमेरिकेचे लष्करी हेलिकॉप्टर पाडल्याचा आणि होर्मुझच्या खाडीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणकडून ड्रोन हल्ले झाल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. याला चोख प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सेंट्रल कमांडने इराणच्या होर्मोजगान प्रांतातील तळांना लक्ष्य केले. अमेरिकेने हे हल्ले स्वसंरक्षणार्थ आणि मर्यादित स्वरूपाचे असल्याचे म्हटले आहे.
या कारवाईदरम्यान इराणच्या अत्यंत महत्त्वाच्या बंदर अब्बास या बंदरावर आणि हवाई तळावर अमेरिकेने ड्रोन नियंत्रण केंद्र आणि रडार यंत्रणांवर बॉम्ब डागले. तसेच इराणच्या नौदलाचा मुख्य तळ असलेल्या कशम आयलँड म्हणजेच बहमन पियर येथील लष्करी दळणवळण यंत्रणेवर अमेरिकेने क्षेपणास्त्रे डागली. या भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये थेट गोळीबार झाल्याचे वृत्त असून जास्क आणि सिरीक या किनारपट्टीच्या भागातही इराणी रडार केंद्रे आणि पायाभूत सुविधांना अमेरिकेने लक्ष्य केले आहे.
या हल्ल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल या भागात असलेल्या अमेरिकन नौदलाच्या तळांवर आणि तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट इशारा दिला आहे की, आमच्या भूमीवर होणारा कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही आणि अमेरिकेने सुरक्षित राहायचे असल्यास हा प्रदेश तातडीने सोडून जावा. दोन्ही देशांमध्ये झालेली तात्पुरती युद्धबंदी या ताज्या संघर्षामुळे पूर्णपणे धोक्यात आली असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत आहे.
















