लातूर/निलंगा : प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी पहाटे भूकंपाचे ४ धक्के बसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. लातूर जिल्ह्यातही काही भागात हे धक्के जाणवले. अशा परिस्थितीत नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच या अनुषंगाने कोणत्याही अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. भूकंप अथवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद््भवल्यास नागरिकांना तत्काळ योग्य मार्गदर्शन आणि माहिती देण्याची दक्षता घ्यावी. तसेच अशा परिस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले.
भूकंपासारख्या आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी, काय करावे याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तसेच सर्व शासकीय विभागांनी सतर्क राहून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी गुुरुवारी येथे दिल्या. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी संबंधित शासकीय यंत्रणांचा आढावा घेतला.
निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक टेकाळे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यावेळी उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील पाऊस व खरीप पेरण्यांची सद्यस्थिती, पाणी टंचाई उपाययोजना आदी बाबींचाही जिल्हाधिका-यांनी यावेळी आढावा घेतला आणि अनुषंगिक सूचना दिल्या. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी माहिती दिली. लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत भूकंप सुरक्षा व आपत्कालीन मार्गदर्शक सूचना जारी आहेत. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा आणि सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
















