जिल्हा परिषद गटांतून २१२ तर पंचायत समिती गणांतून ३५८ जणांची माघार
बहुतांश ठिकाणी दुरंगी, तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार
लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दि. २७ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या ५९ गटांतून २१२ जणांनी तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या ११८ गणांतून ३५८ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी २४२ तर पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ४२० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
लातूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० जागांसाठी ४० तर पंचायत समितीच्या २० जागांसाठी ७० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात प्रामुख्याने काँग्रेस महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा अशी सरळ, सरळ दुरंगी लढत होत आहे. काँग्रेस महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा समावेश आहे. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणूक रिंगणात उतरली आहे तर भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आल्याने त्याचा मोठा फटका भाजपाला बसणार आहे, असे सध्याचे चित्र आहे.
औसा तालुका जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात बहुतांश ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी दुरंगी लढत दिसून येते तर काही मतदारसंघात तिरंगी लढत होईल, असे चित्र आहे.
निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० जागांसाठी ४१ तर पंचायत समितीच्या २० जागांसाठी ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात काही ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी दुरंगी तर काही तालुक्यात काँग्रेस विरुद्ध भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशीही लढत होणार आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २ जागांसाठी १२ तर पंचायत समितीच्या ४ जागांसाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात काही ठिकाणी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अशी तिरंगी तर काही ठिकाणी कॉंग्रेस, भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत दिसून येत आहे.
देवणी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी ११ तर पंचायत समितीच्या ६ जागांसाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात काही ठिकाणी काँग्रेस, भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी तर काही ठिकाणी कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी अशी चौरंगी लढत होणार आहे.
उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी ३५ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी ही युतीविरुद्ध काँग्रेस अशी तर काही ठिकाणी काँग्रेस-भाजपा युती आणि शिवसेना एकनाथ शिंदे अशी तिरंगी लढत होईल, असे चित्र आहे.
जळकोट तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी १३ तर पंचायत समितीच्या ६ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये अनेक जणांनी अपक्ष उमेदवारीदेखील आहेत. जळकोट तालुक्यामध्ये काही ठिकाणी तिरंगी लढत तर काही ठिकाणी चौरंगी लढत होत आहे तर अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असलेल्या गुत्ती मतदारसंघांमध्ये दुरंगी लढत होत आहे.
अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मातब्बर उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढतीचे चित्र आहे.
चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी २० तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ताकदीने मैदानात उतरले असून प्रत्येक गटात आणि गणात चुरशीची लढत होणार आहे.
रेणापूर तालुक्यात
४ जागांसाठी १६ उमेदवार
रेणापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी १६ तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तालुक्यात काही ठिकाणी कॉंग्रेस, भाजपा, मनसे आणि अपक्ष अशी चौरंगी, काही ठिकाणी कॉंग्रेस, भाजपा व वंचित अशी तिरंगी, काही ठिकाणी कॉंग्रेस व भाजपा अशी दुरंगी, काही ठिकाणी कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना (शिंदे गट) काही ठिकाणी कॉग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) काही ठिकाणी भाजपा, कॉंग्रेस व वंचित तिरंगी तर काही ठिकाणी कॉग्रेस, भाजपा व वंचित अशी तिरंगी लढती होत आहे.

