बीड : संतोष देशमुख हत्या आणि इतर संबंधित प्रकरणात बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने मंगळवारी (दि. २२) वाल्मिक कराडची दोषमुक्ती याचिका फेटाळली. विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. यावेळी या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला.
संतोष देशमुख हत्या आणि इतर दोन प्रकरणांत तसेच मोक्का दोषारोपातून आपल्याला मुक्त करावे, यासाठीची याचिका वाल्मिक कराडच्या वतीने दाखल करण्यात आली होती. तर सरकार पक्षाच्या वतीने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. यावरील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्वीच पूर्ण झाले होते आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी न्यायालयाने हा दोषमुक्ती अर्ज फेटाळला.
दोषारोप निश्चिती लांबणीवर
या प्रकरणात इतर आरोपींच्या वतीने दोषमुक्ती अर्ज दाखल करण्यात आले असून त्यावर ४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषारोप निश्चिती मात्र लांबणीवर पडली आहे.
















