मुंबई : प्रतिनिधी
डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली अभूतपूर्व घसरण, वाढता भूराजकीय तणाव, जागतिक अर्थव्यवस्थेबाबत निर्माण झालेली अस्थिरता यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून काढता पाय घेतला असून, जून २०२६ च्या पहिल्याच पंधरवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल ६२ हजार ८५३ कोटींपेक्षा जास्त मूल्यांचे शेअर्स विकले आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराला मोठा धक्का बसला आहे.
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार या नवीन विक्रीमुळे २०२६ या चालू वर्षात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून एकूण २.८७ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. विशेष म्हणजे हा आकडा संपूर्ण २०२५ वर्षात काढलेल्या १.६६ लाख कोटी रुपयांपेक्षा खूप जास्त आहे. जागतिक स्तरावर वाढती आर्थिक अस्थिरता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला असून, आता विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीचा धडाका लावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे प्रिन्सिपल मॅनेजर (रिसर्च) हिमांशू श्रीवास्तव यांच्या मते, सध्या जागतिक बाजारपेठेत व्याजदरांचे भवितव्य, भू-राजकीय घडामोडी आणि आर्थिक वाढीबाबत अनिश्चितता कायम आहे. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणकदार जोखीम कमी करण्यासाठी उदयोन्मुख बाजारपेठांमधून पैसा काढून विकसित बाजारपेठा किंवा तुलनेने सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाकडे वळत आहेत.
भारताला हवी
स्थिर गुंतवणूक
भारतासारख्या मोठ्या तेल आयात करणा-या देशासाठी स्थिर परदेशी गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये भारताचा बॅलन्स ऑफ पेमेंटस तुटवडा सुमारे ६० अब्ज डॉलर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आरबीआय यांनी विदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. परंतु प्रत्यक्षात विदेशी गुंतवणूकदार आपले शेअर्स विकत असल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत.
















