दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऑलिम्पिकपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत खेळायचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) निवड चाचणी धोरण हे अन्यायकारक असून, यामध्ये मातृत्वाच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करणा-या विनेशसारख्या दिग्गज खेळाडूचा विचार करण्याचा कोणताही अधिकार ठेवण्यात आला नव्हता अशी टिप्पणी करत दिल्ली उच्च न्यायालयाने विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीत सहभागी करून घेण्याचा आदेश दिला. मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठाने हा आदेश काढताना ३० आणि ३१ मे रोजी होणा-या निवड चाचण्यांचे चित्रीकरण करण्याचे ‘डब्ल्यूएफआय’ला निर्देश दिले आहेत. निवड चाचणीदरम्यान भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) या दोन्ही संस्थांचे प्रत्येकी एक निरीक्षक देखील उपस्थित राहणार आहेत. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, महासंघाचे धोरण आणि परिपत्रक हे स्पष्टपणे विनेशला वगळण्यासाठीच करण्यात आले होते. मातृत्वासाठी घेतलेल्या विश्रांतीचा विचार करून विनेशसारख्या प्रतिभावान खेळाडूचा विचार करण्याचे कोणतेही अधिकार त्यांनी ठेवले नव्हते. विनेशला कारणे दाखवा नोटीस देताना आधीच बंद झालेले मुद्दे पुन्हा जाणूनबुजून समोर आणल्यासारखे वाटतात. हे खेळाडूच काय पण खेळासाठीदेखील मारक आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्राच्या आणि न्यायाच्या हितासाठी विनेशला निवड चाचणीत भाग घेण्याची परवानगी देणे आवश्यक आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीस अपात्र ठरवल्यानंतर विनेशने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर एकल न्यायाधीशांनी १८ मे रोजी महासंघाच्या बाजूने निर्णय दिला होता. या निर्णयाला विनेशने प्रतिआव्हान देणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला. आपल्या देशात मातृत्वाचा कायम गौरव केला जातो. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाने सूडाच्या भावनेने काम करू नये, अशा कडक शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगटला पुनरागमनापासून रोखणा-या भारतीय कुस्ती महासंघाला फटकारले होते. तांत्रिक मुद्यावर बोट ठेवत महासंघाने विनेशला खेळण्यासाठी अपात्र ठरवले होते. अनुभवी खेळाडूंना सहभागी होऊ देण्याच्या जुन्या पद्धतीमध्ये भारतीय कुस्ती महासंघाने केलेले बदल खूप काही सांगून जातात. बाळंतपणाच्या सुटीनंतर पुनरागमन करू इच्छिणा-या विनेशला आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांच्या चाचणीत भाग घेऊ दिला जाईल याची खात्री करण्याची तसेच अपरिहार्य कारणांसाठी पात्रता निकषांमध्ये शिथिलता आणता येते.
त्यामुळे विनेशच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यची तोंडी सूचना न्यायालयाने केली होती. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निवड चाचणीसाठी महासंघाकडून काढण्यात आलेल्या दोन परिपत्रकांवरून हे सर्व विनेशला रोखण्यासाठी केले जात आहे असे वाटते. महासंघाची ही भूमिका योग्य नाही आणि खेळाच्या हिताची देखील नाही असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. विनेशच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाल्यावर महासंघाने सोमवारपर्यंत हे प्रकरण पुढे ढकलण्याची आणि विनेशला महासंघाकडे अधिकृत अर्ज सादर करण्यास सांगण्याची विनंती न्यायालयाला केली होती. महासंघाच्या कार्यपद्धतीवर आधीच नाराजी व्यक्त करणा-या खंडपीठाने महासंघाची ही विनंती फेटाळून लावली होती आणि विनेश आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीत भाग घेऊ शकते की नाही यावर स्वत: आदेश देऊ असे स्पष्ट केले होते. भारतीय कुस्ती महासंघाने विनेश फोगटला उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणा-या राष्ट्रीय मानांकन कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखले होते, याचे मुख्य कारण म्हणजे महासंघाने तिच्यावर २६ जूनपर्यंत देशांतर्गत स्पर्धांसाठी बंदी घातली होती. त्यामुळे प्रसूतीनंतर पुनरागमन करण्यासाठी विनेशच्या मार्गात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या.
कुस्ती महासंघाने तिला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. याबाबत तिने कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांची भेट घेऊन तात्पुरते उत्तरही दिले होते. पॅरिस ऑलिम्पिकनंतर विनेशने निवृत्ती घेतली होती. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून तिने पुनरागमनाचा निर्णय घेतला. संयुक्त आंतरराष्ट्रीय महासंघ आणि डब्ल्यूएफआय यांच्या नियमानुसार वेळेत निवृत्ती मागे घेण्याची प्रक्रिया विनेशकडून पार पाडण्यात आली होती. अनेक प्रयासानंतर मानांकन स्पर्धेसाठी विनेशचे नाव नोंदवले गेले. उत्तेजक सेवन प्रतिबंध संस्थेची प्रक्रिया देखील तिने पार पाडली. मात्र निकषच बदलल्यामुळे आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या तिच्या मार्गात अडथळे निर्माण झाले. गत दीड वर्षापासून विनेश कुस्तीच्या मॅटपासून दूर होती. परंतु गत काही महिन्यांपासून तिने खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणे कुस्तीची तयारी केली आहे. यापूर्वी तिने देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. आताही तिला देशासाठी पदके जिंकायची आहेत. तीन वर्षांपूर्वी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर सहा महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्या सहा महिला कुस्तीपटूंपैकी एक विनेश फोगटसुद्धा होती. या महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर मंतरवर बृजभूषणविरोधात आंदोलन केले होते.
हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तक्रारी दाखल केलेल्या सहा महिला कुस्तीपटूंच्या साक्षींची प्रक्रिया सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही पीडितेची ओळख सार्वजनिक करू नये, कारण हा त्यांच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा प्रश्न असतो. परंतु या तत्त्वाला छेद देत विनेशने म्हटले आहे की, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे मला आता बोलायचे नव्हते. सत्य देशासमोर उघड होईलच. तरीही मी सांगते की, तक्रार दाखल करणा-या सहा पीडितांपैकी मी एक आहे. कुस्ती महासंघाने उत्तर प्रदेशातील गोंडा येथे स्पर्धा आयोजित केली आहे. तेथेच बृजभूषणचे घर आणि खासगी महाविद्यालय आहे. त्यामुळे तिथे मेहनत करणा-या महिला कुस्तीपटूला तिचा हक्क मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. सरकारने सर्व काही बृजभूषणवर सोपवले आहे. स्पर्धेत पंचगिरी कोण करणार, पंच किती गुण देणार, कोण जिंकणार, कोण हरणार हे सारे बृजभूषण आणि त्यांचे लोक नियंत्रित करणार. अशा परिस्थितीत जिद्दीने स्पर्धेत उतरणा-या, लढाऊ वृत्तीच्या विनेश फोगटला न्याय मिळू शकेल? नाहीतरी बृजभूषणने म्हटले आहे की, मॅडमने जो गोंधळ घातला, तो सध्या मी साफ करतोय. स्पर्धा कुठे होणार हा विषय माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही, हा निर्णय पूर्णपणे सध्याच्या भारतीय कुस्ती महासंघाचा आहे.
















