जळगाव : प्रतिनिधी
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असतानाच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? हे कोणालाच माहिती नसल्याचे सांगत त्यांनी कोणतेही ठोस संकेत देण्यास नकार दिला.
महाजन म्हणाले, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काय चर्चा झाली, हे आपल्या कुणालाही माहिती नाही. या सगळ्या वावड्या आहेत की वस्तुस्थिती आहे, हे आज कोणीही सांगू शकत नाही. कारण शरद पवार हे वरिष्ठ पातळीवर थेट पंतप्रधान मोदी यांना भेटले आहेत. योग्यवेळी जे समोर येईल, तेव्हाच सत्य समजेल.
शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटले हे आपण समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी आंदोलनात संवाद महत्त्वाचा आहे असे शरद पवार यांना वाटले होते. त्यामुळे शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पवार साहेब हे कधीही एनडीएसोबत जाणार नाहीत, त्या विचारांसोबत जाणार नाहीत. सुप्रिया सुळेदेखील विचाराच्या पक्क्या आहेत, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवरही गिरीश महाजन यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, तुमच्या हातात काही नाही, एवढं लक्षात ठेवा. रोज दिल्लीत हे चाललंय, तिकडे जाणार आहेत, इकडे जाणार आहेत, अशा वावड्या उठवल्या जातात. आमच्या पक्षाने त्यांना काही अधिकार दिले आहेत का, काय ठरवायचे किंवा नाही ते सांगण्यासाठी? स्वत:च्या पक्षात काय सुरू आहे, त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. दुस-यांच्या पक्षाबाबत अफवा पसरवण्याचे काम ते सातत्याने करत असतात.
सुनील तटकरे-अमित शहा भेटीवर प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घेतलेल्या भेटीबाबत विचारले असता महाजन म्हणाले, ते खासदार आहेत, नेते आहेत. महत्त्वाच्या विषयांसाठी त्यांनी भेट घेतली असेल. अशा भेटी पुढेही होत राहतील. शेवटी राज्याचा गाडा महायुतीच्या तिन्ही पक्षांना मिळून चालवायचा आहे.
















