शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यात सुरुवातीस झालेल्या पावसानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामावर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस न पडल्याने आणि जोरदार वारे वाहत असल्याने जमिनीतील ओल वेगाने कमी होत आहे परिणामी पेरणीची कामे ठप्प झाली असून तालुक्यात आतापर्यंत केवळ २० टक्के पेरणी झाली आहे.
शेतक-यांनी सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस आदी पिकांसाठी शेतांची मशागत करून बियाणे व खतांची व्यवस्था केली आहे मात्र पावसाने पाठ फिरवल्याने अनेकांनी पेरणी पुढे ढकलली आहे. ज्या शेतक-यांनी सुरुवातीच्या पावसावर वश्विास ठेवून पेरणी केली, त्यांच्या पिकांच्या उगवणीबाबतही आता चिंता वाढली आहे. सतत वाहणा-या वा-यामुळे जमिनीतील ओलावा कमी होत असल्याने पिकांवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला वेग येतो. यंदा मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. वेळेत समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतक-यांसह कृषी क्षेत्राचे लक्ष आता आगामी पावसाकडे लागले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने लवकरच पावसाची शक्यता वर्तवली असली तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस होणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या तालुक्यातील शेतक-यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दोन-तीन दिवसांत समाधानकारक पाऊस झाला तर उर्वरित पेरणी पूर्ण होईल. अन्यथा खरीप हंगामावर मोठे संकट येऊ शकते, असे शेतक-यांचे म्हणणे आहे.
















