मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नसल्याची ओरड होत असताना आता पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतक-यांना ५ रुपये, ८ रुपये व १३ रुपयांची मदत करण्यात आल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत सरकारने शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे.
यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. विशेषत: मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतील पीक-पाण्याचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतजमीनच खरडून गेल्यामुळे रबी हंगाम कसा घ्यायचा? हा प्रश्न शेतक-यांपुढे उभा राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज घोषित केले. तसेच ही मदत दिवाळीपूर्वी शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्याची ग्वाहीही दिली. पण दिवाळी संपून आठवडा होत आला तरी ही मदत शेतक-यांना मिळाली नसल्याचा आरोप होत आहे.
५ रुपयांत शेतकरी जगणार कसा?
त्यानंतर आता पीक विमा योजनेतही शेतक-यांना ५-१० रुपयांची मदत करण्यात आल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, राज्यात शेतक-यांवर अस्मानी संकट आले, शेतक-यांना मदत मिळणे दूरच उलट प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतक-यांची अवहेलना करण्यात आली आहे. अकोला येथील शेतक-यांना ५ रुपये, ८ रुपये, १३ रुपये अशी मदत करण्यात आली आहे. याला जखमेवर तिखट चोळणे म्हणतात.
एकीकडे हातातील पीक गेले, जे आहे त्या शेतमालाला भाव मिळत नाही. जे नुकसान झाले त्याचा विमा असा पाच रुपये मिळणार असेल तर शेतकरी जगणार कसा? शेतक-यांना मदत सोडा पण त्यांचा असा अपमान करू नका, असे ते म्हणाले.
अकोला जिल्ह्यातील कुटासा परिसरातील दिनोडा, मरोडा, कावसा व रेल या गावांतील शेतक-यांच्या खात्यात पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई म्हणून ५ ते २७ रुपयांची मदत जमा झाली आहे. अरुण राऊत या शेतक-याच्या खात्यावर ५ रुपये ८ पैसे, संदीप घुगे यांना ५ रुपये, गणपत सांगळे यांना १३ रुपये, विजय केंद्रे याना १४ रुपये ७ पैसे, केशव केंद्रे यांना १६ रुपये १५ पैसे, आदित्य मुरकुटे यांना २१ रुपये ८५ पैसे व उमेश कराड यांच्या खात्यावर २७ रुपये ५ पैसे जमा झाले आहेत.
तुटपुंजी रक्कम मिळालेले हे शेतकरी प्रातिनिधिक आहेत.
याशिवायही अनेक शेतक-यांच्या खात्यावर अशीच तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे. या संतप्त शेतक-यांनी बुधवारी काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिका-यांची भेट घेऊन ही मदत सरकारला परत केली.

