मुंबई : (प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ नंतर पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) ९ पैकी ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ६ खासदार मंगळवारी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन पत्र देणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, यातच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘या सगळ्या कॅम्पेनचे कॅप्टन संजय देशमुख तर वाईस कॅप्टन नागेश आष्टीकर आहेत,’ असा दावा केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरची पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदार अचानक दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे खासदार परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे हे दिल्लीत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भातील पत्र सादर करण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. त्यापैकी सहा खासदारांनी वेगळा निर्णय घेतल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार आवश्यक असलेले दोन-तृतीयांश संख्याबळ पूर्ण होते आणि स्वतंत्र गट स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण मोहिमेचे कॅप्टन खासदार संजय देशमुख असून वाईस कॅप्टन नागेश पाटील आष्टीकर आहेत. पक्षात सुरू असलेल्या या हालचालींमध्ये या दोघांची प्रमुख भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.
नागेश पाटील आष्टीकर हे ठरवून सगळ्यांना वेड्यात काढायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वाटते की ते सगळ्यांत मोठे तीसमार खान आहेत. पण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या आणि संजय देशमुख यांच्या चाललेल्या जेवणावेळी अगदी परवाच्या रात्री ओव्हरस्मार्ट बनत त्यांनी मला आणि पक्ष नेतृत्वाला केलेला कॉल हे सगळे आम्ही समजून उमजून आहोत. या सगळ्या कॅम्पेनचे कॅप्टन संजय देशमुख तर वाईस कॅप्टन नागेश आष्टीकर आहेत,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
















