सेलू : प्रतिनिधी
प्रशासनाकडून हुकूमशाही पद्धतीने आणि अत्यंत कमी दरात जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सेलू तालुक्यातील शेतक-यांनी जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी केल्या जाणा-या भूसंपादन प्रक्रियेला कडाडून विरोध दर्शविला आहे. जर प्रशासनाने जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे हे ‘षडयंत्र’ हाणून पाडले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शेतक-यांनी दिला.
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांना मंगळवारी निवेदन दिले. त्यात पुढे म्हटले की, समृद्धी महामार्गासाठी शेतक-याच्या उच्च दर्जाच्या सुपीक जमिनी आणि फळबाग लावलेल्या जमिनीचे संपादन केले जात आहे. मात्र, यासाठी मिळणारा मोबदला अत्यंत तुटपुंजा आहे. तसेच त्यातून अल्प मोबदला मिळाला आहे.
लोकशाही मार्गाने चर्चा न करता, प्रशासन सक्तीने जमिनी बळकावत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. जोपर्यंत प्रशासन शेतक-यांशी थेट चर्चा करून योग्य तो तोडगा काढत नाही, तोपर्यंत पुढील कोणतीही कार्यवाही करू नये. जर प्रशासनाने जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर हे ‘षडयंत्र’ हाणून पाडले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
निवेदनावर रमेश विठ्ठलराव गाडेकर, अनिरुद्ध नाईक, दत्ता देशमाने, प्रशांत नाईक, गणेशराव मुंडे, सोनू खरात, पंजाब गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, रमेशराव माने यांच्यासह अनेक शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.
प्रति हेक्टरी केवळ १८.८० लाख मिळतो दर
शासनाकडून केवळ १८ लाख ८० हजार रुपये प्रति हेक्टर या दराने मोबदला दिला जात आहे, जो बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. रेडी रेकनर दर म्हणजे प्रत्यक्ष बाजारभाव नव्हे, याचे भान प्रशासनाने ठेवावे, अशी मागणी शेतक-यांनी निवेदनातून केली.
















