जळकोट : प्रतिनिधी
शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६ मध्ये राबविण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतक-यांनी खरीप हंगाम २०२६ साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस. आर . पाटील यांनी केले आहे,
जळकोट तालुक्यातील अधिकाधिक शेतक-यांनी नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे होणा-या संभाव्य नुकसानीपासून आपल्या पिकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, जळकोट यांच्या वतीने करण्यात आले असताना खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्य आणि अटी याबाबत अधिक माहिती देताना कृषी अधिकारी यांनी योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अत्यंत अनिवार्य आहे. डिजिटल पीक सर्वेक्षण, पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांनी आपल्या पिकांची नोंद डिजिटल पीक सर्वेक्षण अंतर्गत ७/१२ वर करणे बंधनकारक आहे. पीक विम्यातील पीक आणि सर्वेक्षण नोंदणीतील पीक यामध्ये तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
या योजनेत सहभागी होण्यासाठी होण्यासाठी बिगर कर्जदार आणि इच्छुक कर्जदार शेतकरी सदरील माध्यमांतून या योजनेत सहभाग नोंदवू शकतात. जवळचे ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (कॉमन सर्व्हिस सेंटर), राष्ट्रीय पीक विमा पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावरून थेट
ऑनलाईन अर्ज भरू शकतात. व्यापारी व सहकारी बँकांच्या स्थानिक शाखांमार्फतही अर्ज स्वीकारले जातील. बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने (उदा दुस-याच्या क्षेत्रावर किंवा मृत शेतक-याच्या नावे) विमा उतरवल्याचे आढळल्यास संबंधित अर्जदारावर फौजदारी कारवाई केली जाईल. तसेच, अशा व्यक्तीस पीक विमा व ‘नमो शेतकरी महासन्मान’ यांसारख्या कृषी विभागाच्या कोणत्याही डीबीटी योजनांचा लाभ घेण्यापासून पुढील ५ वर्षांसाठी प्रतिबंधित (बंदी) करण्यात येईल.
















