मुंबई : प्रतिनिधी
भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून मान्सूनची प्रगती मंदावली होती आणि खरिपाचा हंगाम असतानाच पावसाची तूट वाढत चालली होती. मात्र, आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण आता मान्सूनचा पाऊस घेऊन येणारे ढग तयार होऊ लागले आहेत.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजांनुसार, मध्य भारतात पाऊस घेऊन येणारे ढग हळूहळू पुन्हा जोर धरतील. त्यामुळे सर्वदूर मान्सूनचा पाऊस पडण्याची प्रतीक्षा करणा-या महाराष्ट्रासह सर्वच राज्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सुरुवातीच्या जोरदार आगमनानंतर रेंगाळलेला मान्सून आता पुन्हा एकदा सर्वदूर सक्रिय होत असल्याचे या अंदाजावरून दिसून येते. उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक भागांत अजूनही मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू झालेला नसला, तरी वाढती ढगांची गर्दी आणि वादळाची स्थिती पाहता, आगामी दिवसांत मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९ जून ते २५ जून दरम्यान छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मान्सून संथ गतीमुळे पुढे सरकत असल्याने पश्चिम आणि मध्य भारतातील राज्यांना मोठा फटका बसला आहे. पण, आता हळूहळू परिस्थिती अनुकूल होत असून, मध्य भारतासाठी हा बदल एक महत्त्वाचे वळण ठरू शकतो.
हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचा पाऊस घेऊन येणा-या ढगांचे हे पुनरागमन अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण मान्सूनचे अधिकृत आगमन होऊनही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील मोठ्या भागामध्ये निरभ्र आकाश आणि तीव्र उष्णता पाहायला मिळत होती.
पाऊस आणि वादळी वा-यांची शक्यता
हवामान विभागाने महाराष्ट्रासह इतर राज्यांतील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. पश्चिम मध्य प्रदेश : २१ जून ते २३ जून दरम्यान ताशी ४०-५० किमी वेगाने (कमाल ६० किमी प्रतितास) वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात १९ जून ते २३ जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. छत्तीसगडमध्ये २० जून ते २३ जून दरम्यान वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, २२ आणि २३ जून रोजी पावसाचा जोर अधिक असेल.
व्यापक स्वरूपातील पाऊस सुरू होण्यापूर्वी, काही भागांत मान्सूनपूर्व तीव्र हवामानाचा अनुभव येऊ शकतो. हवामान विभागाने १९ आणि २० जून रोजी पश्चिम मध्य प्रदेशात ५०-६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. पूर्व मध्य प्रदेशातही १९ जून रोजी अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे.
इतर राज्यांमध्येही मान्सूनची प्रगती
मान्सूनचे हे पुनरागमन केवळ मध्य भारतापुरते मर्यादित राहणार नाही. येत्या आठवड्यात दक्षिण भारतातील राज्यांत देशातील सर्वाधिक पाऊस पडेल, असा अंदाज आहे. कर्नाटक : किनारपट्टीवरील कर्नाटकात २१ ते २५ जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज असून, उत्तर आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात २२ आणि २३ जून रोजी तीव्र पाऊस पडू शकतो.
















