सेलू : दिलीप डासाळकर
पावसाळा सुरू होऊन जवळपास २ महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र आजपर्यंत सेलू तालुक्यात केवळ ९७.५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सेलू शहराला पाणीपुरवठा करण-या निम्न दुधना प्रकल्पामध्ये सध्या केवळ २२.६४ टक्के जिवंत पाणीसाठा असल्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सेलू तालुक्यात आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्यास सेलू शहर आणि तालुक्यावर दुष्काळाचे सावट पडण्याची शक्यता आहे.
या वर्षी पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडाच गेला असून जुलै महिन्याच्या प्रारंभीच थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यानंतर पावसाळी वातावरण दररोज निर्माण होत आहे. मात्र पाऊस पडत नाही अथवा थोड्याफार पावसाच्या सरी कोसळतात. त्यामुळे पेरण्या झालेल्या पिकांना तात्पुरते जीवदान मिळते. मात्र पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसत आहे.
निम्न दुधनात केवळ २२ टक्केच पाणीसाठा
सेलू शहर आणि तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांकरता वरदान ठरलेल्या निम्न दुधना प्रकल्पामध्ये यावर्षी केवळ २२.६४ टक्केच जिवंत पाणीसाठा आहे. येत्या काळात पुरेसा पाऊस पडला नाही तर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ शकतो. सिंचनासाठी देखील पाणी मिळणार नसून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील भेडसावू शकतो. सेलू तालुक्यातला वरदान ठरलेले निम्न दुधना प्रकल्प सध्यातरी कोरडा असून पाणी तळाला पोहोचलेले आहे.
मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत किमान तीन ते चार वेळा निम्न दुधना प्रकल्पातून विसर्ग करण्यात आलेला होता. मात्र यावर्षी विसर्ग करण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही. भविष्यात पाण्याची टंचाई भासू शकते आणि त्यामुळेच दुष्काळाचे सावट निर्माण होऊ शकते. निम्न दुधना प्रकल्पात जर ८० टक्के पाणीसाठा झाला तरच निम्न दुधना प्रकल्पाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा तसेच परभणी जिल्ह्यातील सेलू या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय गरज भासल्यास परभणी व नांदेड जिल्ह्याकरिता देखील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. येत्या काही दिवसात पुरेसा पाऊस न झाल्यास पाणीटंचाई प्रश्न गंभीर बनणार आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
सेलू तालुक्यात आजपर्यंत जवळपास सर्व शेतक-यांनी पेरण्या केलेल्या आहेत. सेलू तालुक्यात निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असला तरीही कोरडवाहू शेती सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाची एखादी सर येते आणि पिकाला तात्पुरते जीवदान मिळते. मात्र मोठा आणि दिलासा देणारा पाऊस या पावसाळ्यात झालेला नाही. सेलू शहर आणि तालुक्यात सर्वच शेतक-यांचा कल कापूस, सोयाबीन व तूर पिकांकडे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हवा तसा पाऊस झाल्यास सेलू तालुक्यावर दुष्काळाचे सावट घोंगावणार आहे.
















