बोरी : पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने सोयाबीन करपल्यामुळे हताश झालेल्या कोरडवाहू शेतजमीन असलेल्या शेतक-याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील वर्णा या गावात घडली.
जिंतूर तालुक्यातील बोरी व दुधगाव महसूल मंडळातील विविध गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने खंड दिल्यामुळे पिके हातची गेली आहेत. बोरी या गावापासून जवळच असलेल्या वर्णा या गावातील गट नंबर ३४३च्या वाडी शिवारात हरिभाऊ सुभानराव ढवळे (वय ६२ वर्षे) यांची ३ एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी बँकेचे कर्ज व बी बियाणे उधार घेऊन पेरणी केली होती. आर्थिक विवंचनेमुळे ते काही दिवसांपूर्वी पुणे शहरात कामाला सुद्धा गेले होते. दि. १६ सप्टेंबर रोजी पुणे येथून ते सकाळी वर्णा या त्यांच्या गावी आले आणि शेतात जाऊन वाळलेल्या सोयाबीनची पाहणी केली. घरी परतल्यानंतर कुणालाही काहीही न बोलता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
वर्णाचे पोलिस पाटील डिगांबर अंभूरे यांनी बोरी सपोनी अभिजीत आडके यांना माहिती दिल्यानंतर पोलिस जमादार भागवत पवार व इतर पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. शेतकरी ढवळे यांच्या पश्चात दोन मुले, तीन सुना व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे बोरी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
















