लातूर : प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर शाखेतर्फे राबविण्यात येत असलेल्या शहर स्वच्छता अभियानाला नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवार दि. १९ जुलै रोजी बार्शी रोड व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार पडलेल्या अभियानात शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री सोनकांबळे यांनी सहभागी होत श्रमदान केले.
यावेळी पीव्हीआर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय आणि बार्शी रोड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्त्याच्या कडेला व दुभाजकांमध्ये साचलेला प्लास्टिक कचरा आणि इतर घनकचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयएमएच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. या अभियानात आयएमए लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. सुबोध सोमाणी, डॉ. श्वेता काटकर, डॉ. गणेश पवार, डॉ. रमेश भराटे, सुभाष दुर्गावाड, लातूर महापालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत श्रमदान केले.हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असून दर महिन्याच्या ९, १९ आणि २९ तारखेला आयोजित करण्यात येणा-या स्वच्छता अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी केले.
















