नाशिक : प्रतिनिधी
महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. खरातविरोधात दाखल झालेला हा गुन्हा मास्टरस्ट्रोक ठरला आहे. या प्रकरणात फिर्यादीने चक्क गुप्तहेराप्रमाणे खरातच्या घरात स्वयंपाकी (कूक) पाठवून त्याच्याकडून या भोंदूची माहिती मिळवली. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी फिर्यादीतील माहिती आहे.
बँकिंग लोन कन्सल्टंट व खरातचा सीए राहिलेल्या ललित प्रकाश पोफळे यांनी खरातने आपल्याला मृत्युयोगाची भीती दाखवून तसेच शक्तिपीठ महामार्गालगत मालमत्ता खरेदीच्या आमिषातून तब्बल आठ कोटी ७६ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यात ललित पोफळे यांनी पोलिसांना जी माहिती दिली त्यातून खरातच्या कुकर्मांच्या पुराव्यांचा पेटाराच खुला झाला आहे.
ललित पोफळे याने आपल्या मर्जीतील एका तरुणास खरातकडे अनेक महिने कूक म्हणून नोकरीस ठेवून खरातच्या काळ्या कृत्याचा भांडाफोड केल्याचे तपासात उघड झाले आहे. खरातचे काळे कारनामे बाहेर काढण्यामागे त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधवनंतर आता या कूकचीही भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
खरातने त्याच्या मिरगाव येथील फार्म हाऊसवर जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक्याची (कूक) गरज असल्याचे ललित पोफळे यांना सांगितले होते. खरातवर त्यांना संशय आल्याने त्यांनी एखाद्या गुप्तहेराप्रमाणे आपल्या मर्जीतील एकाला कूक म्हणून खरातच्या फार्म हाऊसवर पाठवले. त्याचा पगारही ललित पोफळे देत असत. याच कूकने फार्म हाऊसवर खरातच्या कुकर्मांचे पुरावे गोळा केले आहेत. हे पुरावे आता एसआयटीच्या हाती लागले आहेत.
आजवर खरात याच्या लैंगिक शोषणाचे जे व्हीडीओ समोर आले ते त्याच्या नाशिक येथील कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयात छुप्या कॅमे-यातील होते. मात्र खरात फार्म हाऊसवर देखील पीडित महिलांना नेत असल्याचे समोर आले आहे. या कूकची ड्युटी फार्म हाऊसवर होती. फार्म हाऊसवर महिलांना आणले की, खरात हा कूकला सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यासाठी सांगत असे परंतु, हा कूक कॅमेरे बंद करीत नसे. खरातचा एकेकाळचा विश्वासू ललित पोफळे याने जी फिर्याद खरातच्या विरोधात दाखल केली त्यात कूकबाबतचा हा धक्कादायक खुलासा केला आहे.
खरात जेव्हा थकत असे, तेव्हा फार्म हाऊसवर किमान दोन रात्र थांबत असे. रात्री काही महिलांसोबत आतमध्ये दारू पीत असे, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करीत असे. हे सर्व तेथील सीसीटीव्हीत कैद झाले आहे, असे पोफळे याने फिर्यादीत म्हटले आहे. हे सारे बिंग पोफळे यांनीच खरातकडे पाठविलेल्या कूकमुळे फुटले आहे.
भोंदू अशोक खरातचा विश्वासू म्हणून ललित पोफळेची ओळख होती. मीरगाव येथील शिवनिका संस्थानच्या कार्यकारिणीवर संचालक राहिलेले ललित प्रकाश पोफळे (रा. वरळी) हे खरातचे सीएही होते. परंतु खरात पूजाविधीच्या नावाखाली हातचलाखीने पेटीतून नाग काढून बनाव रचत होता. खरातच्या या अनैतिक कृत्यांचा व्हीडीओ असलेला पेनड्राईव्ह पोफळेंच्या हाती लागला होता. खरातने पोफळे यांनाही आठ कोटींचा चुना लावला. त्यानंतर खरातच्या दैवी चमत्कारांबद्दलचा त्यांचा विश्वास उडाला. त्यांनी त्यानंतर शिवनिका संस्थानवरील विश्वस्तपदावरून स्वत:ला दूर केले होते.
मुंबईमध्ये झाली बैठक
त्यानंतर खरातचे भक्त असलेले राजेंद्र जासूद, दिनेश परब हे पोफळेंच्या संपर्कात आले. त्यांनाही खरातचा खरा चेहरा माहिती झाला. त्याच कालावधीत खरातने ऑफिस बॉयच्या पत्नीवर अत्याचार केले असल्याचे समजले. खरातचे अनैतिक कृत्य उघड करून त्याला कायदेशीर शिक्षा कशी देता येईल याबाबत पोफळेंच्या मुंबईतील घरी राजेंद्र जासूद, दिनेश परब यांच्यासोबत अनेकवेळा बैठका झाल्या. एकदा पोफळेंना दिनेश परबने सांगितले की, ऑफिस बॉयने खरातच्या ऑफिसमध्ये स्पाय कॅमेरा लावलेला आहे. स्पाय कॅमे-याच्या व्हीडीओमुळे खरातचे कारनामे पुढे येणार होते. त्यामुळे सर्वांचा ऑफिस बॉयला पाठिंबा होता. कालांतराने ऑफिस बॉयकडून कॅमेरा घेऊन एकाने त्यातील व्हीडीओ शिर्डी पोलिसांना दिले.
















