यिझुआंग : वृत्तसंस्था
चीनमधील बीजिंगच्या आग्नेय भागात असलेल्या यिझुआंगमध्ये नुकतीच एक मॅरेथॉन झाली. या मॅरेथॉनमध्ये माणसांबरोबर चक्क २० रोबोट्स (यंत्रमानव) धावले… आणि त्याहूनही महत्त्वाचं असं की, ही मॅरेथॉन अखेरीस जिंकली, ती हाडामासाच्या एका मानवी धावपटूनेच! यिझुआंग प्रांत म्हणजे चीनमधील अनेक मोठमोठाल्या टेक फर्म्सचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सुमारे १२ हजार माणसांबरोबर २० विविध आकारांचे, रंगांचे आणि उंचीचे रोबोट्स सहभागी झाले होते.
२१ किलोमीटरचं चढ-उतारांचं अंतर सगळ्यांना कापायचं होतं. या अंतरात माणसे स्वत:ला ताजंतवानं करण्यासाठी पाणी प्यायली तर रोबोट्सनी आपल्या बॅटरीज बदलल्या. माणसांबरोबर स्पर्धा करताना रोबोट्स मागे पडत आहेत असं दिसलं तर त्यांच्या निर्मात्यांना त्यांच्या android मध्ये बदल करण्याची परवानगी होती. पण अशा प्रत्येक ब्रेकसाठी पेनल्टी म्हणून त्यांची १० मिनिटं कमी केली जात होती. बीजिंग रोबोट्स इनोव्हेशन सेंटरने तयार केलेल्या ‘तियान पोंग अल्ट्रा’ नावाच्या रोबोटने ही मॅरेथॉन पूर्ण करायला दोन तास चाळीस मिनिटं घेतली. युगांडाच्या जेकब किप्लिमोचं २१ किलोमीटर मॅरेथॉनचं रेकॉर्ड ५६.४२ मिनिटांचं आहे. प्रत्यक्षात ही मॅरेथॉन जिंकलेल्या स्पर्धकाने हे अंतर एक तास दोन मिनिटांमध्ये कापलं.
पहिल्या मॅरेथॉनमध्ये माणसांनी रोबोट्सना हरवलं असलं, तरी चीनने तयार केलेले रोबोट्स हे पाश्चात्त्य कंपन्यांनी तयार केलेल्या रोबोट्सपेक्षा उजवे असल्याचे विजेत्या कंपनीने म्हटलं आहे.
चीनने २०२३ मध्ये निश्चित केलेल्या धोरणानुसार रोबोटिक इंडस्ट्री हा तांत्रिक निकषावर प्रगतीचा एक नवा आयाम असल्याचं म्हटलं होतं. रोबोट्सच्या निर्मिती आणि व्यवसायासाठी २०२५ चं उद्दिष्टही निश्चित करण्यात आलं होतं. इंटरनेटवर चीनच्या तांत्रिक प्रगतीचं दर्शन घडवणारा भरपूर कंटेंट पाहायला मिळतो. गेल्या काही वर्षांमध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञान आणि एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञा मानवी क्षमतांवर मात करतील का, भविष्यात त्यामुळे मानवी क्षमतांचं महत्त्व कमी होईल का? असे अनेक प्रश्न सातत्याने चर्चेत असतात. पहिल्या मॅरेथॉननंतर तरी या प्रश्नांची मिळणारी उत्तरं ‘नाही’ अशीच असतील, असं चित्र आहे.