परभणी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिंतूर येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर वरिष्ठ महाविद्यालय आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित), नाशिक, शाखा आमदार कॉलनी, जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत जिंतूर येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर वरिष्ठ महाविद्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध नामांकित उद्योग, कंपन्या व खासगी आस्थापनांचा सहभाग राहणार आहे. या मेळाव्यात १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांची क्षेत्र अधिकारी, ट्रेनी ऑपरेटर, विमा सल्लागार, विमा सखी, लाईफ मित्र, कार्यालयीन कर्मचारी (ऑफिस स्टाफ) आदी पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी प्रारंभीचे मासिक वेतन १० ते २५ हजार इतके असून अनुभवाच्या आधारे वेतनात वाढ होऊ शकते.
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी. तसेच प्रत्यक्ष नावनोंदणीसाठी व मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. ३१ जुलै रोजी आवश्यक कागदपत्रांसह स्वखर्चाने जिंतूर येथे उपस्थित राहावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.
















