जळकोट: ओमकार सोनटक्के
यंदा दिवाळीचा सण शेतक-यांसाठी आनंदाऐवजी आर्थिक विवंचना घेऊन आला आहे. एकीकडे जळकोट तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे आता सरकार मदत देताना अनेक निकष लावत आहे . यामध्ये महत्त्वाचे म्हणजे ज्या शेतक-याजवळ फार्मर आयडी नाही अशा शेतक-यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय कार्यालयातील माहितीनुसार जळकोट तालुक्यामध्ये २१ हजार ७६६ फार्मर आयडी धारक शेतकरी आहेत तर जळकोट तालुक्यामध्य २६ हजार ४५० शेतक-यांची अनुदानासाठी यादी तयार करण्यात आली आहे. शेतक-यांची संख्या आणि फार्मर आयडीची संख्या बघितली तर जवळपास ४ हजार शेतक-याजवळ फार्मर आयडी नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जळकोट तालुक्यातील अनेक शेतकरी हे फार्मर आयडी नसल्यामुळे अनुदानापासून वंचित राहणार आहेत. जळकोट तालुक्यामध्ये २६४५० शेतकरी आहेत. यापैकी अत्यल्प भूधारक शेतक-यांची संख्या २१०५ एवढी आहे तर अल्पभूधारक शेतक-यांची संख्या २० हजार एवढी आहे तर भूधारक शेतक-यांची संख्या ३५२९ एवढी आहे.
















