कीव्ह : युक्रेनने शनिवारी केलेल्या भीषण ड्रोन हल्ल्यानंतर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये काही तास दाट काळ्या धुराचे लोट पाहायला मिळत होते. मॉस्कोच्या पूर्वेला साधारण ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या इलेक्ट्रोस्टाल भागातील ‘वाइल्डबेरीज लॉजिस्टिक्स कॉम्प्लेक्स’ आणि नोगिन्स्क येथील एका तेल डेपोला या हल्ल्यामुळे भीषण आग लागली. स्थानिक गव्हर्नर आणि महापौरांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने युक्रेनवर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला आहे, असा दावा युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने रात्रभरात तब्बल ४१ क्षेपणास्त्रे डागली, यापैकी १८ क्षेपणास्त्रे युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेने हवेतच यशस्वीरित्या पाडली. युक्रेनियन ड्रोननी इलेक्ट्रोस्टालमधील वाइल्डबेरीजच्या मोठ्या लॉजिस्टिक्स केंद्राला आणि एका मोठ्या गोदामाला लक्ष्य केले. त्यांनी नोगिन्स्कमधील एका तेल डेपोवरही हल्ला केला. २४ साठवण टाक्या असलेला नोगिन्स्क डेपो हा मॉस्को प्रदेशासाठी एक महत्त्वाचा इंधन केंद्र आहे. अनेक तास आकाशात काळ्या धुराचे लोट पसरत होते. मॉस्कोच्या महापौरांनी सांगितले की, या प्रदेशाच्या दिशेने ३७० हून अधिक ड्रोन डागण्यात आले. रशियन संरक्षण यंत्रणांनी त्यापैकी अनेक ड्रोन रोखले, पण काही त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचले आणि त्यामुळे आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. प्रादेशिक गव्हर्नर म्हणाले की, इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, परंतु कोणताही तात्काळ धोका नाही.
झेलेन्स्की यांचे निवेदन आणि प्रत्युत्तरात्मक कारवाई
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून या लॉजिस्टिक्स केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. ही केंद्रे रशियाला प्रतिबंधित ड्रोनचे सुटे भाग पुरवत होती, असा आरोप केला आहे. युक्रेनचे म्हणणे आहे की, रशिया त्यांच्या शहरांवर हल्ले करत आहे, त्यामुळे ते रशियामधील लष्करी आणि साहाय्यक तळांना लक्ष्य करत आहेत.
















