मुंबई : प्रतिनिधी
स्थानिक पातळीवरील पक्ष मजबुतीसाठी काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल सुरु केले असून बुधवारी राज्यातील ६९ नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. काँग्रेसने दिल्लीतून पक्षाच्या नूतन जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली. या यादीत अनेक नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करताना काँग्रेसने २०२९ च्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनेची घडी बसवण्याचा प्रयत्न केला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष नियुक्ती प्रक्रिया स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी चर्चा करून राबवण्यात आली. पक्षाने नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यात जवळपास १० दिवस मुक्काम करत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी पदाधिकारी, स्थानिक नेते आणि विविध समाजघटकांशी सविस्तर संवाद साधला. जिल्हानिहाय संघटनात्मक परिस्थिती, स्थानिक नेतृत्वाची स्वीकारार्हता, जनाधार, सामाजिक प्रतिनिधित्व आणि पक्षविस्ताराची क्षमता या बाबींचा विचार करून निरीक्षकांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे जिल्हाध्यक्षांच्या नावांच्या शिफारसी सादर केल्या होत्या. या शिफारसींना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अंतिम मान्यता दिल्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण ६९ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यामध्ये विविध समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
नवीन जिल्हाध्यक्षांमध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात पक्षाने चार जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. पुणे पूर्वच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जगताप, पुणे पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदी दीप्ती चौधरी, पुणे ग्रामीण उत्तराच्या जिल्हाध्यक्षपदी कमलाकर सातव आणि पुणे ग्रामीण दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी लहु नवंगुणे यांची नियुक्ती झाली आहे.
कोल्हापूर जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे.ठाणे शहराध्यक्षपदावरून विक्रम चव्हाण यांना हटवून त्यांच्या जागी राहुल पिंगळे यांना संधी देण्यात आली आहे. तर ठाणे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी चेतनसिंग पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. उल्हासनगर शहराध्यक्षपदी रोहित साळवे तर वसई-विरारच्या जिल्हाध्यक्षपदी कॅप्टन नीलेश पेंढारी
यांची नियुक्ती झाली आहे.
काँग्रेसने अहिल्यानगर शहराध्यक्ष म्हणून दीपकचव्हाण, अहिल्यानगर ग्रामीण उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन गुजर तर अहिल्यानगर ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील यांची नेमणूक केली आहे. नाशिक शहर जिल्हाध्यक्षपदी नीलेश खैरे, नाशिक ग्रामीण उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश कहांडोले तर नाशिक ग्रामीण दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी भारत टेकेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी डॉ. जवळगेकर
लातूर शहराच्या अध्यक्षपदी डॉ. शिवाजीराव जवळगेकर, तर ग्रामीणचे अध्यक्षपदी अभय साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अन्य जिल्हाध्यक्ष पुढील प्रमाणे
भिवंडी शहर- अबीद खान मुनसफ, धुळे शहर- खान मोहम्मद सबीर, धुळे ग्रामीण- युवराज करंकाळ, जळगाव शहर-जमील शेख, जळगाव ग्रामीण पूर्व – धनंजय चौधरी, जळगाव ग्रामीण पश्चिम- अविनाश भालेराव, कल्याण शहर- नवीन सिंग, मीरा भाईंदर शहर- राकेश राजपुरोहित, नागपूर शहर -प्रफुल्ल गुडधे, नंदुरबार -दीपक पटेल, नवी मुंबई शहर- रामचंद्र दळवी, रायगड उत्तर- डॉ. मनीष पाटील , रायगड दक्षिण- राजेंद्र ठाकूर
















