चेन्नई : तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा गुरुवारी विस्तार करण्यात आला. यामध्ये आणखी २३ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आज मंत्रिमंडळात सामील झालेल्या एकूण आमदारांपैकी २१ आमदार विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाचे आहेत, तर दोन आमदार काँग्रेसचे आहेत. राजेश कुमार आणि थिरू पी. विश्वनाथन अशी या काँग्रेस आमदारांची नावे आहेत. राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांनी या सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
व्हीसीके आणि आययूएमएल हे पक्ष सध्या या मंत्रिमंडळाचा भाग नाहीत. विजय यांच्या मंत्रिमंडळात ७ मंत्री दलित समाजातील आहेत. तर मंत्रिमंडळात ४ महिला मंत्र्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी १० मे रोजी मुख्यमंत्री विजय यांनी ९ मंत्र्यांसह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तामिळनाडू मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ३५ मंत्री असू शकतात. आतापर्यंत मुख्यमंत्री विजय यांच्यासह मंत्रिमंडळातील मंर्त्यांची संख्या ३२ झाली आहे. उर्वरित २ जागा व्हीसीके आणि आययूएमएल या मित्रपक्षांसाठी ठेवण्यात आल्याचे समजते.
५९ वर्षांनंतर काँग्रेस पक्ष सत्तेत
तामिळनाडूमध्ये तब्बल ५९ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाने थेट सत्तेत सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (टीव्हीके) यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या राजेश कुमार आणि पी. विश्वनाथन या दोन आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत द्रमुकसोबत युती केली होती; मात्र, निकालानंतर सत्तेतील वाटणीवरून मतभेद झाल्याने, काँग्रेसने द्र्रमुकची साथ सोडून थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाच्या सरकारला बाहेरून दिलेला पाठिंबा काढून थेट सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
















