नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ३५ वी पुण्यातिथी आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वडिलांसोबतचा आपला बालपणीची फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाबा, तुमचे स्वप्न मी पूर्ण करणारच असे भावूक कॅप्शनही राहुल गांधी यांनी दिले आहे.
बाबा, तुम्ही पाहिलेले कुशल, समृद्ध आणि सामर्थ्यवान भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन. तुमची शिकवणी, तुमचे संस्कार आणि तुमच्या आठवणी नेहमीच माझ्यासोबत राहतील आणि मला मार्ग दाखवत राहतील असे म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तत्पूर्वी गुरूवारी सकाळी राजधानी दिल्लीतील राजीव गांधी यांचे समाधी स्थळ असलेल्या ‘वीर भूमी’ येथे काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी प्रियंका गांधी यांची मुले मिराया आणि रेहान वाड्रा हे देखील उपस्थित होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, पी. चिदंबरम, भूपिंदर सिंग हुड्डा आणि मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेत्यांनी वीर भूमीवर जाऊन राजीव गांधी यांना नमन केले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. हिंदुस्थान हा एक जुना देश आहे पण एक तरुण राष्ट्र आहे. मला अशा हिंदुस्थानचे स्वप्न पडते जो मजबूत, स्वतंत्र, स्वावलंबी आणि जगातील आघाडीच्या देशांमध्ये मानवतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल, हे राजीव गांधी यांचे वाक्य खरगे यांनी पोस्ट केले. ते पुढे म्हणाले की, मतदानाचे वय १८ वर्षे करणे, पंचायती राज व्यवस्था मजबूत करणे आणि देशात टेलिकॉम व माहिती तंत्रज्ञान क्रांतीची पायाभरणी करण्याचे श्रेय राजीव गांधी यांनाच जाते. त्यांनी देशाला ख-या अर्थाने आधुनिकतेकडे नेले.
















