मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (एसआयआर) पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रक्रियेत राज्यातील ९.७८ कोटी मतदारांपैकी ७५.५२ लाख मतदार अनुपस्थित आहेत किंवा सापडले नाहीत. तर १७.६३ लाख मतदारांची नावे दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एसआयआर अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर महिनाभर दावे व हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली जाईल. यादीत नाव नसलेल्या मतदारांना आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणा-या नवमतदारांना फॉर्म ६ भरून नाव नोंदविता येणार आहे.
एसआयआर ३० जून ते १७ ऑगस्टदरम्यान बूथस्तरीय अधिका-यांनी (बीएलओ) राज्यात घरोघरी जाऊन गणना अर्ज जमा केले. ९.७८ कोटी मतदारांच्या अर्जापैकी २.०७ कोटी मतदारांचे गणना अर्ज संकलित झाले नाहीत. यापैकी ७५.५२ लाख मतदार अनुपस्थित अथवा सापडले नाहीत, तर ७६.८० लाख मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. ३४.८१ लाख मतदार मृत असून, १७.६३ लाख मतदारांची नावे अन्यत्र आधीच नोंदलेली किंवा दुबार असल्याचे आढळले आहे. अन्य कारणांमुळे २.२३ लाख अर्ज या श्रेणीत आहेत.
अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी
असंकलित मतदारांच्या तात्पुरत्या याद्या संबंधित जिल्हाधिका-यांच्या संकेतस्थळांवर चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींना या याद्यांतील मतदारांबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून पात्र मतदारांकडून आवश्यक अर्ज मिळवून त्याची बीएलओमार्फत पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुरुस्तीसाठी फॉर्म ८, तर मतदाराचे नाव वगळण्यास हरकत घेण्यासाठी फॉर्म ७ दाखल करता येईल. खोटी माहिती किंवा घोषणा दिल्यास लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० च्या कलम ३१ नुसार एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
















