मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए)सहाय्यक अभियंता भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी असल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करून यातील गैरप्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सरकारी स्पर्धा परीक्षेत उघड होत असलेल्या सततच्या गैरप्रकारांबद्दल सुळे यांनी मंगळवारी एक्स या समाज माध्यमातून चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये परीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. आता एमएमआरडीए भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळे पुन्हा एकदा सरकारी परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परीक्षेत अनेक संशयास्पद बाबी समोर आल्याने त्यांची सखोल चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी लाखो मुले, त्यांचे पालक आणि त्यांचे स्वप्न या सर्वांच्या कष्टांचे मोल सरकारने राखायला हवे. त्यामुळे एमएमआरडीएची भरती प्रक्रिया तातडीने रद्द करुन उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या परीक्षेतील गैरप्रकाराची चौकशी करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. हा विषय फक्त एका परीक्षेचा नाही. तर मागील एक वर्षात मुंबई महापालिका, पुणे महापालिका, एमआयडीसी, सिडको, राज्य विद्युत पारेषण कंपनी अशा आठ ते नऊ परीक्षांमध्ये घोटाळे झाल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थ्यांनी पुणे महापालिका परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराबद्दल शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्याचा तपास बंद करण्यात आल्याचे विद्यार्थांचे म्हणणे आहे. तसेच विद्युत पारेषण कंपनीच्या परीक्षेत काही संशयित विद्यार्थी आढळून आल्याने याबद्दल चौकशी होणे गरजेचे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
















