Homeमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशन...विरोधक आक्रमक, चहापानावर बहिष्कार

पावसाळी अधिवेशन…विरोधक आक्रमक, चहापानावर बहिष्कार

हिंदी सक्ती, शक्तिपीठ, मंत्र्यांचा भ्रष्टाचार, अकरावी प्रवेशावरून सरकारला घेरणार

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात सोमवारी होत असून विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची जोरदार तयारी विरोधकांनी केली आहे. हिंदी सक्तीबरोबरच प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी कर्जमाफी, मंत्र्यांचा भ्रष्टाचार, सत्ताधारी नेत्यांची बेताल वक्तव्ये आदी विषयांवर आक्रमक भूमिका घेऊन, सरकारला जाब विचारू असे विरोधी पक्षनेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

भ्रष्ट व मस्तवाल सरकारच्या चहापानाला जाण्याचे पाप आम्ही करणार नाही असे सांगत विरोधकांनी बहिष्काराची घोषणा केली. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन गाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्यावरून राजकारण तापलेले असताना, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आरोप-प्रत्यारोपांच्या बराच गडगडाट झाला. अधिवेशातील रणनिती आखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली.

या बैठकीनंतर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. राज्यातली कायदा सुव्यवस्थेची स्थिती, बोकाळलेला भ्रष्टाचार, शेतक-यांची स्थिती, भ्रष्टाचारात गुंतलेले मंत्री असे अनेक विषय अधिवेशनात उपस्थित केले जातील, अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. त्याचवेळी शेतक-यांबाबत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

राज्याला आवश्यक नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा अट्टाहास, पुण्याचे हगवणे प्रकरण, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आदी विषय या अधिवेशनात लावून धरणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाचे लोकं वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत, पोलिसांचे त्यांना संरक्षण आहे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांना प्रोत्साहन देतायेत, नेमके भाजप आणि गद्दारांनी आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे अशी टीका दानवे यांनी केली.

चहापानावर बहिष्कार टाकण्याच्या मागील भूमिका स्पष्ट करताना शिवसेना विधिमंडळ पक्ष नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र व्देष्ट्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जायचे म्हणजे पाप आहे. ही महायुती नव्हे तर महाझुठी सरकार आहे म्हणजे भाजप व दोन गद्दार गँग हे सरकार ज्या पध्दतीने चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांची तीन दिशेला तीन तोंड आहेत. कधी बंगल्यांवरून एकमेकांमध्ये भांडतात तर कधी तर मोटारींवरून तर कधी कोणत्या जिल्ह्याचे कोण मालक मंत्री तर कोण पालक मंत्री बनणार आणि माझा फंड यांनी चोरला हे लोक मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे सांगतात. कदाचित त्यांच्यामध्ये समन्वयाची गरज आहे. म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण चहापानाला जायचे नाही. निदान चहापानाच्या कार्यक्रमात एकमेकांची तोंड तरी बघतील असा टोला त्यांनी मारला

गोगावलेचे आरोप गंभीर
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मर्डर करूनच मोठे झाले असे खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे मंत्री खून करून पंतप्रधानांच्या बाजूला बसत असतील तर पंतप्रधानांच्या सुरक्षेला किती मोठा धोका निर्माण केला आहे. एखादा जबाबदार मंत्री केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य करू शकतो अशावेळेस पोलिसांनी बोलावून त्यांचा जबाव घेतला पाहिजे. नक्की तुमच्याकडे काय माहिती आहे याची चौकशी केली पाहिजे कोणते खून झाले आहेत यासाठी चौकशी दोघांची केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी बोलावून घ्यायला पाहिजे.

भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले सरकार : वडेट्टीवार
राज्यातील महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे. पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. निधी हवे तरी टक्केवारी मोजावी लागते असा आरोप काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. कांदा, कापूस धानाला सोयाबीन पिकाला भाव नाही.कापसाला कीड लागलेली असताना मदत दिली जात नाही. सरकारने सत्तेवर आल्यावर जनतेला वा-यावर सोडले आहे. त्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. महायुती सरकार राजकीयदृष्ट्या उध्वस्त झाले आहे. या सरकारचा सुरू असलेला राजकिय जुगार हा केविलवाणा व किळसवाणा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत आहे, त्याला राजकीय रंग का दिला जातोय असा सवाल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार असून गरज नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR