नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या सुळसुळाटावर आणि त्यांच्यामुळे होणा-या त्रासावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. कुत्रे माणसांमधील भीती ओळखू शकतात आणि त्याच भीतीमुळे ते हल्ला करतात किंवा चावा घेतात असे निरीक्षण आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ यांनी नोंदवले.
आज सलग दुस-या दिवशी अडीच तास सुनावणी पार पडली. यानंतर न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी स्पष्ट केले की, न्यायालय शुक्रवारी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करेल. गेल्या ७ महिन्यांत सहा वेळा सुनावणी भटक्या कुत्र्यांच्या सुनावणी झाली आहे.
याचिकाकर्त्याच्या वकिलांनी आकडेवारी सादर करताना सांगितले की, राज्यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपालिकांकडून नेमके किती निवारे चालवले जातात, याची स्पष्टता नाही. संपूर्ण देशात केवळ ५ सरकारी निवारे असून, त्यातील प्रत्येकाची क्षमता १०० कुत्र्यांची आहे. भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची देशात मोठी कमतरता असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
प्राणी कल्याण संस्थेच्या वतीने बाजू मांडणारे वकील सी.यू. सिंह यांनी कुत्र्यांना त्यांच्या मूळ जागेवरून हटवण्यास किंवा निवा-यात पाठवण्यास विरोध दर्शवला. कुत्रे हटवले तर उंदरांची संख्या वाढेल, असा युक्तिवाद त्यांनी केला.

