Homeमहाराष्ट्रसलग ३ वर्षांपासून राज्यात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक

सलग ३ वर्षांपासून राज्यात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक

– उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई पालिकेच्या ठेवी सुरक्षित
मुंबई : प्रतिनिधी
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये झालेल्या करारांमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) येत असून २०२६ मध्ये सुमारे ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सलग ३ वर्षे देशात अव्वल ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.

दावोस दौ-यातील करारांमुळे राज्यात उद्योगवाढ आणि मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. या वर्षी झालेले करार केवळ एमआयडीसीपुरते मर्यादित नसून उद्योग विभाग, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्या माध्यमातूनही मोठ्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. उद्योग विभागामार्फत १५ लाख १५ हजार कोटी रुपयांचे, एमएमआरडीएमार्फत १५ लाख १० हजार कोटी रुपयांचे आणि एमएसआरडीसीमार्फत एक लाख कोटी रुपयांचे करार झाल्याची माहिती त्यांनी दिली. इतर राज्यांमध्ये करार अंमलबजावणीचा दर ३५ ते ४० टक्के असताना महाराष्ट्रात २०२२ पासून हा दर ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

मुंबई पालिकेच्या ठेवी सुरक्षित

मुंबईतील पायाभूत सुविधांबाबत बोलताना मंत्री सामंत यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी सुरक्षित असून विकास कामांसाठी निधीचा योग्य वापर केला जात आहे. शहरातील १०४८ रस्ते पूर्ण झाले असून त्यांची एकूण लांबी २७८.८३ कि. मी. आहे. पहिल्या टप्प्यातील सुमारे ५४ टक्के आणि दुस-या टप्प्यातील ५६ टक्के काम पूर्ण झाले आहे. मिठी नदी प्रकल्पाबाबतही माहिती देताना त्यांनी सांगितले की, या कामात पूर्वी काही अनियमितता आढळून आल्याने चौकशी सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR