मुंबई : प्रतिनिधी
रमजान ईदचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी शीरखुर्मा खाऊन सणाचा आनंद द्विगुणित करतात. मात्र, यंदा शीरखुर्मासाठी लागणारे सुकामेव्याचे पदार्थ महाग झाले आहेत. सुकामेव्याचे पदार्थ आखाती देशांमधून आयात होतात. युद्धामुळे आयातीवर परिणाम झाला असून सुकामेव्याच्या सर्व पदार्थांच्या किमतीत वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आहे.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर रोजा करतात. उपवासामुळे झालेली शारीरिक झीज भरून काढण्यासाठी खजूर, काजू, बदाम, पिस्ता, किसमिस आणि खोबरे अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते. रमजान ईदची नमाज झाल्यानंतर सर्वच घरांमध्ये सुकामेव्यापासून शीरखुर्मा बनवला जातो. या दिवशी घरी येणा-या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत शीरखुर्मा देऊन केले जाते.
सध्या नाशिक शहरात खरेदीची लगबग सुरू आहे. सुकामेवा पदार्थ विकत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसत आहे. ईदमुळे सुकामेव्याची मागणी लक्षात घेत व्यापा-यांनी दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद शहरातून सुकामेवा मागवला आहे. मात्र, मागील वर्षीपेक्षा यंदा नागरिकांना सुकामेवा खरेदीसाठी वीस ते पंचवीस टक्के जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
बहुतेक सुकामेवा हा आखाती देशांमधून येतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे सुकामेवा आयातीवर परिणाम झाला आहे. सध्या रमजान महिना असल्याने सुकामेव्याची मागणी वाढली आहे. परिणामी सुकामेव्याच्या किमतीमध्ये वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आहे.
खजुराची विशेष मागणी : रमजान महिन्यात रोजा सोडताना खजूर खाण्याची परंपरा असल्यामुळे खजुराच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे खजुराच्या किमतीतही अधिक वाढ नोंदवली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणा-या बहरी प्रकारच्या खजुराला विशेष मागणी आहे. खजूर हे आरोग्यवर्धक फळ मानले जाते.

