कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मात्र, मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच राज्याच्या विविध भागांतून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. नादिया जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाला असून हावडा येथेही मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप समर्थकांमध्ये जोरदार चकमक उडाली आहे.
नादिया जिल्ह्यात भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात उमेदवाराच्या गाडीच्या काचा फुटल्या असून, सुदैवाने उमेदवार बचावले असले तरी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना किरकोळ दुखापत झाली आहे. भाजपने या हल्ल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसवर केला आहे याशिवाय हावडा जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर दोन गटांत बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाला हस्तक्षेप करावा लागला.
आज कोलकाता, हावडा आणि उत्तर व दक्षिण २४ परगणा यांसारख्या ७ जिल्ह्यांमधील १४२ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या टप्प्यात सुमारे ३.२१ कोटी मतदार १४०० हून अधिक उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. हिंसाचाराची शक्यता लक्षात घेता निवडणूक आयोगाने विक्रमी संख्येने सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.
हा टप्पा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप या दोघांसाठीही प्रतिष्ठेचा मानला जात आहे. दक्षिण बंगाल हा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो, तर भाजपने येथे मोठे खिंडार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. दुपारपर्यंत मतदानाचा टक्का चांगला राहण्याची शक्यता असली तरी, ठिकठिकाणी होणाऱ्या हिंसाचारामुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

