नवी दिल्ली / बीजिंग: भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये एक मोठी सकारात्मक घडामोड घडली आहे. गेल्या सहा वर्षांपासून विस्कळीत झालेली थेट हवाई कनेक्टिव्हिटी आता पूर्णपणे पूर्वपदावर येत असून, दोन्ही देशांच्या प्रमुख विमान कंपन्यांनी आपली सेवा पुन्हा सुरू केली आहे. अलीकडेच इंडिगोचे (IndiGo) विमान चीनमधील ग्वांगझू (Guangzhou) येथे यशस्वीरित्या उतरले, तर एअर चायनाने (Air China) आपली अत्यंत महत्त्वाची दिल्ली-बीजिंग सेवा पुन्हा सुरू करून दोन्ही राजधानींना जोडले आहे.
इंडिगोने दिल्ली ते ग्वांगझू ही थेट विमान सेवा सुरू केली आहे. याशिवाय २९ मार्च २०२६ पासून कोलकाता ते शांघाय ही दैनंदिन सेवाही सुरू झाली असून, या मार्गावर प्रवाशांचा ६८% ते ८५% पर्यंत प्रतिसाद मिळत आहे तर तब्बल ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एअर चायनाने २१ एप्रिल २०२६ पासून दिल्ली-बीजिंग सेवा पुन्हा सुरू केली आहे. एअर चायनाची सेवा आठवड्यातून तीन दिवस (मंगळवार, शुक्रवार आणि रविवार) उपलब्ध असेल. हे विमान बीजिंगहून दुपारी ३:१५ वाजता उड्डाण करून रात्री ८:२० वाजता दिल्लीत पोहोचेल. २०२० मधील सीमावाद आणि कोरोना महामारीमुळे ही सेवा बंद झाली होती. आता थेट विमान सेवा सुरू झाल्यामुळे व्यापार, तंत्रज्ञान कंपन्या आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
“थेट विमान सेवा सुरू झाल्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचणारच आहे, पण त्यासोबतच पुरवठा साखळीचा खर्च (Supply Chain Costs) कमी होण्यास मदत होईल. हे दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध सुधारण्याच्या दिशेने एक व्यावहारिक पाऊल आहे.” या हवाई कनेक्टिव्हिटीच्या पुनरुज्जीवनामुळे भारत आणि चीनमधील आर्थिक संबंधांची एक नवीन पहाट सुरू झाल्याचे मानले जात आहे. यामुळे केवळ उद्योगपतींनाच नाही, तर शिक्षण आणि पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

