Homeलातूरलातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी!

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी!

उष्णतेचा कहर, निलंगा तालुक्यातील दुसरा तर जिल्ह्यातील चौथा मृत्यू
लातूर : प्रतिनिधी
यंदाच्या उन्हाळ््यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कडक उन्हाचा कहर जाणवत असून विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान चांगलेच वाढले आहे. उष्माघातामुळे राज्यात ब-याच जणांचा बळी गेला असून, लातूर जिल्ह्यात उष्माघाताने आणखी एकाचा बळी गेला. निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे शेतात काम करीत असताना चक्कर आल्याने ७५ वर्षीय शेतकरी त्र्यंबक नारायण बेळंबे यांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे औराद शहाजानीनंतर तालुक्यातील उष्माघाताची ही दुसरी तर जिल्ह्यातील चौथी घटना ठरली आहे. दरम्यान, कर्नाटकात सीमेलगत मेहकर तालुक्यात आणखी एकाचा उष्माघाताने बळी गेला.

लातूर जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीआधीच उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून आज आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली. पानचिंचोली (ता. निलंगा) येथील शेतकरी त्र्यंबक नारायण बेळंबे हे दि. २८ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास ते जनावरांसाठी चारा कापत असताना अचानक ते चक्कर येऊन झाडाखाली बसले. पाणी पिल्यानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि ते जागीच कोसळले. घटनेनंतर त्यांना तात्काळ पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. दुपारच्या वेळी तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याने उष्माघातामुळेच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात उष्माघाताच्या बळींचा आकडा चारवर गेला आहे.

दरम्यान, मृतदेहाचे शवविच्छेदन पानचिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीपकुमार जाधव यांनी दिली. यंदा तापमानाची तीव्रता अधिक असल्याने सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यापूर्वी जिल्ह्यात उष्माघातामुळे तिघांचा बळी गेला आहे. त्यात औसा तालुक्यातील एरंडी गावात २५ वर्षीय महेश लिंबाजी इंगोले या तरुणाचा शेतातील कामावरून घरी आल्यानंतर चक्कर येऊन मृत्यू झाला होता तर औसा तालुक्यातील गोंद्री येथे नऊ महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. आणखी एका घटनेत औराद शहाजानी येथे ६० वर्षीय शेतक-याचाही प्रखर उन्हामुळे मृत्यू झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून दुपारच्या सुमारास तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. औराद शहाजानी भागात हवामान केंद्रावर काल ४३.५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातच जिल्ह्यात उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मराठवाड्याचे तापमान
छ. संभाजीनगर : ४३.४
जालना : ४२.९
बीड : ४१.६
नांदेड : ४३
परभणी : ४३.७
धाराशिव : ४२
लातूर : ४१

अकोल्याचे तापमान
तब्बल ४७ अंशांवर
विदर्भात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून अकोल्यात तापमान ४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. अमरावतीमध्ये ४५.२ तर वर्ध्यात ४५.० अंश तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांतही तापमानाचा पारा चढाच आहे. त्यामुळे विदर्भातही उष्माघाताचा धोका वाढला आहे.

राज्यात उष्माघाताचे १० बळी
राज्यात रोज तापमानाचा नवा रेकॉर्ड तयार होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. उष्णतेच्या या भीषण लाटेत आतापर्यंत १० जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. अनेकांची प्रकृती बिघडली. हवामानाचा पारा आजही जैसे थे बघायला मिळाला.
सीमेलगत कर्नाटकात
शेतक-याचा मृत्यू
निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानीलगत कर्नाटकात मेहकर (ता. भालकी) येथील शेतकरी सुनील किशनराव पाटील (५६) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी शेतात कामासाठी गेलेले पाटील यांना अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. त्यांच्यावर तत्काळ हुलसूर येथे प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना सोलापूर येथे हलविण्यात आले. पण २ वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे उपचारांची स्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना गावी आणले होते. मंगळवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता मेहकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली असा परिवार आहे.