Homeमहाराष्ट्रमहिलेकडून लाखो उकळणारा भोंदू आढावबाबा अटकेत

महिलेकडून लाखो उकळणारा भोंदू आढावबाबा अटकेत

अहिल्यानगर : प्रतिनिधी
गेली तीन वर्षे विविध जडीबुटी देण्याच्या नावाखाली, १५ ते १६ लाख रुपये उकळले, दागिने काढून घेतले, एवढ्यावर न थांबता, शरीरसुखाची मागणी करत भोंदूबाबा महिलेच्या घरी पोहोचला. या प्रकाराला कंटाळून अखेर पीडिता महिलेने टाकळीभान इथला भोंदूबाबा अशोक मधुकर आढाव याच्याविरोधात तक्रार देताच, श्रीरामपूर पोलिसांनी त्याला अटक केली. अशोक मधुकर आढाव ऊर्फ आढावबाबा याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तंत्र-मंत्राच्या नावाखाली विवाहितेची आर्थिक फसवणूक आणि विनयभंग केल्याप्रकरणी अशोक आढाव याला अटक करताच, यापूर्वी अटक केलेल्या भोंदू गणेशबाबा आणि आढावबाबा यांच्यातील पैसा कमवण्याच्या कारनाम्यांच्या चर्चांना तोंड फुटले आहे. भोंदूबाबाचा हा दुसरा प्रकार उघडकीस आल्याने श्रीरामपूर भोंदूबाबांचा अड्डा असल्याच्या चर्चा होत असून, वेगवेगळ्या बाबांची नावे चर्चेत आली आहेत.

​फिर्यादी महिलेला होत असलेल्या शारीरिक त्रासाचा फायदा घेत, अशोक आढाव याने भूतबाधा उतरवण्याचे आमिष दाखवले. फेब्रुवारी २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत त्याने महिलेला जडीबुटी खाण्यास देऊन वेळोवेळी दक्षिणेच्या नावाखाली रोख आणि ऑनलाईन माध्यमातून सुमारे १५ ते १६ लाख रुपये उकळले. इतकेच नाही तर सोन्याच्या वस्तूही लांबवल्या. पैशाचा हव्यास एवढ्यावरच थांबला नाही, तर आढावने फिर्यादीच्या राहत्या घरी जाऊन शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. डी. जाधो यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने आठ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR