लातूर/पुणे : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून, लातूरमध्ये तळ ठोकून असलेल्या सीबीआयच्या पथकाकडून सातत्याने कारवाईचा धडाका सुरू आहे. लातूरमधील सिद्धिविनायक बालरुग्णालयाचे प्रमुख बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांच्या रुग्णालयावर दोन दिवसांपूर्वी छापे टाकून चौकशी केल्यानंतर सीबीआयने चौकशीसाठी पुण्यात बोलावले होते. बुधवारी रात्री त्यांना ताब्यात घेऊन प्रथम चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना रात्री उशिरा सीबीआयने अटक केली. या आधी पेपर फोडणारा आणि पेपर विक्री करणा-या सूत्रधारांना अटक केली.
यामध्ये पेपर विकत घेणारे पालक आणि विद्यार्थीही चौकशीच्या फे-यात अडकले होते. त्यामुळे डॉ. शिरुरे यांच्या रुपाने प्रथमच एक पेपर विकत घेणारे पालक जाळ््यात अडकले आहेत. दरम्यान, लातूरमध्ये गुरुवारी डॉ. शिरुरे यांच्या नातेवाईकाच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आणि तेथे नातेवाईकांची चौकशी करून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. यामुळे लातुरात खळबळ उडाली आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने कसून तपास सुरू ठेवला असून, लातूरमध्ये या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे सापडत असल्याने सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे. या पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ३ डॉक्टरही सामिल असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सीबीआयने तपासाची चक्रे फिरवित सिद्धिविनायक बालरुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांच्या रुग्णालयावर दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने छापा टाकून झाडाझडती घेत असताना डॉक्टरांचीही चौकशी केली होती. चौकशीदरम्यान, त्यांचा मोबाईल आमि काही महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले होते. तसेच हाती लागलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांना पुण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. पुण्यात त्यांची चौकशी करून काल रात्री उशिरा अटक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
डॉ. मनोज शिरुरे यांनी पालक म्हणून आपल्या पाल्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक झालेले निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी, आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याशीही डॉ. शिरुरे यांचे निकटचे संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयकडून या संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू असून, लातूरमधील काही विद्यार्थी, पालक आणि कोचिंग संस्थांच्या संबंधितांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. डॉ. शिरुरे यांचा मागील काही वर्षांपासून पेपरफुटीच्या नेटवर्कमध्ये सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणी प्रथमच पालक अटकेत
नीट पेपरफुटी प्रकरणी प्रथमच डॉ. शिरुरे यांच्या रूपाने एका विद्यार्थ्याच्या पालकाला अटक झाली. आतापर्यंत ज्यांनी नीटचा पेपर फोडला, नीटचा पेपर विकला, यांच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु आता नीटचा पेपर स्वत:च्या मुलासाठी खरेदी करणा-या पहिल्या पालकाला सीबीआयने अटक केली. त्यामुळे चौकशीच्या फे-यात अडकलेल्या पालकांचे धाबे दणाणले आहेत.
डॉ. शिरुरेच्या नातेवाईकाच्या लातूरमधील घरावर छापा
डॉ. शिरुरेला बुधवारी रात्री उशिरा अटक केल्यानंतर गुरुवारी अंबाजोगाईत पालक-विद्यार्थ्याची चौकशी करणा-या सीबीआयच्या पथकाने लातूरमधील डॉ. शिरुरेच्या नातेवाईकाच्या घरी छापा टाकला आणि संपूर्ण घराची झाडाझडती घेतानाच अडीच ते तीन तास नातेवाईकांची चौकशी केली. तसेच विविध कागदपत्रे जप्त केली आणि या चौकशीदरम्यान रोकडही जप्त केली. मात्र, नेमकी किती रक्कम जप्त केली, हे समजू शकले नाही.
अंबाजोगाईत आईसह दोन मुलांची चौकशी
नीट पेपरफुटीत बीड कनेक्शन
नीट पेपरफुटी प्रकरणात आता बीड कनेक्शन समोर आले असून, अंबाजोगाईतील २ विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षिका आईची सीबीआयकडून तब्बल सव्वादोन तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशी करण्यात आलेले हे दोन्ही बहीण-भाऊ लातूरमध्ये शिक्षण घेत होते. यापैकी बहीण रिपीटर विद्यार्थिनी असून ती पुन्हा नीट परीक्षा देत होती तर भाऊ पहिल्यांदाच परीक्षेला बसला होता. हा पेपर या दोघांसाठीच घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांच्या शिक्षिका असलेल्या आईलाही प्रश्न विचारण्यात आल्याने तपासाची व्याप्ती वाढल्याचे दिसून आले.
आरसीसीने सुरू केली विद्यार्थ्यांची सराव परीक्षा
नीट पेपरफुटी प्रकरणाची तपासचक्रे लातूरमधील आरसीसी प्रमुख प्रा. शिवराज मोटेगावकर आणि आरसीसीभोवती फिरत आहेत. यामुळे आरसीसीचे नीट परीक्षेशी संबंधित क्लासेस बंद झाले होते. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेत लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसने विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा सुरू केली. नीट परीक्षा पुन्हा घेण्यात येत आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम लक्षात घेऊन आरसीसीच्या नियोजन समितीने सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने कॅम्पसमध्ये दाखल झाले आहेत. परीक्षा पद्धतीनुसार त्यांची तयारी करून घेतली जात आहे.
मोटेगावकरशी संबंधित क्लासचालक, शैक्षणिक नेटवर्क संशयाच्या भोव-यात
बीडमधील ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ या शिक्षक संघटनेचा शिवराज मोटेगावकर हा ब्रँड अँबेसिडर असल्याचे समोर आले. दरम्यान, मोटेगावकरशी संबंधित क्लासचालक आणि शैक्षणिक नेटवर्कही संशयाच्या भोव-यात सापडले आहेत. बीड शहरातील शाहूनगर परिसरात अनेक कोचिंग क्लासेस आणि शिक्षण संकुले कार्यरत आहेत. त्यामुळे मोटेगावकरांशी संबंधित कोचिंग क्लासेसही रडारवर आहेत.
















