लातूर: जिल्ह्यातील ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वी केलेली आहे, त्यांनी येत्या ३० जूनपूर्वी आपल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवून घेणे बंधनकारक आहे. अन्यथा १ जुलैपासून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कडक दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिला आहे. शासनाने ही नंबर प्लेट बसवण्यासाठी आता ३० जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली असून, त्यानंतर कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण ५ लाख ५९ हजार २९७ वाहने आहेत. यापैकी आतापर्यंत ३ लाख २० हजार ५०७ वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेतली आहे. हे प्रमाण एकूण वाहनांच्या ५७.३१ टक्के इतके आहे. म्हणजेच अद्यापही ४० टक्क्यांहून अधिक वाहनांना ही प्लेट बसवणे बाकी असून, त्यांनी मुदतीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या वाहनांना अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नाही, अशा वाहनांचे हस्तांतरण, पुनर्नोंदणी, तसेच वाहनावरील बँक बोजा उतरवणे यांसारख्या आरटीओशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या शासकीय प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण होणार आहेत.
१ एप्रिल २०१९ नंतर उत्पादित होणाऱ्या सर्वच नवीन वाहनांना कंपनीकडूनच एचएसआरपी प्लेट बसवून मिळते, मात्र त्यापूर्वीच्या वाहनांना ती स्वतंत्रपणे बसवावी लागत आहे. वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड आणि बनावटगिरी रोखणे, वाहन चोरी किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कृत्यांमध्ये बनावट नंबर प्लेटचा वापर थांबवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांची माहिती एकाच प्रणालीवर अद्ययावत करणे हे या निर्णयमागील मुख्य उद्दिष्ट आहे.
यापूर्वी या नंबर प्लेट्स बसवण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटची मुदत ३१ मार्च रोजी संपल्याने वाहनधारकांमध्ये कधीही दंडात्मक कारवाई सुरू होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने आता ३० जूनपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. १ जुलैपासून मात्र कोणतीही सबब ऐकली जाणार नाही आणि थेट १,००० रुपये दंड आकारला जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रसाद गाजरे यांनी वाहनधारकांना आवाहन केले आहे की, ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरच जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी, आवश्यक शुल्क भरावे आणि मिळालेल्या वेळेनुसार आपली नंबर प्लेट बसवून घ्यावी. इतर कोणत्याही बनावट किंवा अनधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून आपली आर्थिक फसवणूक करून घेऊ नये.
















