दिल्ली : दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा क्षण आता जवळ आला आहे. जेवर येथील बहुप्रतीक्षित नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टवरून कमर्शियल व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचाच अवधी उरला आहे. १५ जूनपासून या भव्य विमानतळावरून विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग अधिकृतपणे सुरू होत असून पहिल्या फ्लाईटचे वेळापत्रकही समोर आले आहे.
नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टवरून उड्डाण करणारी पहिली विमान कंपनी इंडिगो असणार आहे. पहिली फ्लाईट १५ जून रोजी सकाळी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ७:०५ वाजता उड्डाण करेल. हे विमान सकाळी ८:०५ वाजता नोएडा जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करेल. यानंतर हेच विमान जेवर विमानतळावरून सकाळी ८:३५ वाजता बेंगळुरूसाठी झेप घेईल.
इंडिगोच्या वेळापत्रकानुसार, विमानतळाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी एकूण ८ फ्लाईट्स टेक-ऑफ आणि लँडिंग करतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जूनपासून ही संख्या वाढून १२ होईल. सुरुवातीच्या टप्प्यात बेंगळुरू, लखनऊ, भोपाल, अमृतसर, हैदराबाद, जम्मू आणि नवी मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांसाठी विमान सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच, १७ जूनपासून एअरपोर्टवरून मालवाहू विमानांची वाहतूकही सुरू केली जाईल.
पहिल्या टप्प्यात हे विमानतळ १३३४ हेक्टरवर उभारण्यात आले असून, याची वार्षिक क्षमता १.२ कोटी प्रवाशांची आहे. यामध्ये ३९०० मीटर लांबीचा देशामधील एक सर्वात मोठा रनवे आणि भव्य एटीसी टॉवर तयार करण्यात आला आहे. भविष्यात २०४० पर्यंत ५ रनवेसह वार्षिक २२.५ कोटी प्रवाशांची क्षमता असलेले हे जगातील मोठ्या विमानतळांपैकी एक बनेल.
जेवर विमानतळ हे नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि फरीदाबादच्या रहिवाशांसाठी अत्यंत जवळ असणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने विविध वाहतूक व्यवस्था केली आहे. प्रवाशांना विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी दिल्लीच्या काश्मिरी गेट, आनंद विहार, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन तसेच उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या विविध शहरांतून इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या सेवांसह महिंद्रा लॉजिस्टिक्स सोबत करार करून विशेष पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक टॅक्सींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जर तुम्ही स्वतःच्या खाजगी वाहनाने येत असाल, तर पहिल्या २ तासांसाठी १५० रुपये पार्किंग शुल्क असेल आणि त्यानंतर प्रति तास १०० रुपये आकारले जातील. दिवसाचे कमाल पार्किंग शुल्क ६०० रुपये असेल. तसेच कमर्शियल वाहनांसाठी पहिल्या २ तासांचे शुल्क २०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. पश्चिम आशियातील चालू युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे एअरलाईन इंडस्ट्रीवर सध्या दबाव आहे, तरीही जेवर विमानतळाची ही सुरुवात दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि संपूर्ण उत्तर भारताच्या विकासाला गती देण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.
















