धाराशिव : (प्रतिनिधी)
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. नेटक-यांनी ‘गद्दारी करू नका’ अशी हाक दिली आहे, तर गावक-यांनी राजीनामा देऊन निवडून येण्याचे आवाहन केले आहे. मंत्रिपद आणि वडिलांच्या खटल्याचा निकाल बाजूने लावण्याचे आमिष दाखवून दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. विशेष म्हणजे ओमराजेंना बंडखोरी करण्याच्या बदल्यात मंत्रिपद मिळणार आहे. शिवाय त्यांच्या वडिलांच्या हत्येचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्याचे अमिषही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियातही या बंडाचे पडसाद उमटले आहेत. या बंडावर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. ओमराजे गद्दारी करू नका, अशा कमेंट नेटकरी करत आहेत. त्यामुळे ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करणार वीडियो पोस्ट केला होता. त्यावर नेटक-यांनी ओमराजे, गद्दारी करू नका, दादा गद्दारी करू नका….अशा कमेंटसचा पाऊस पाडला आहे. ओमराजेंचा व्हिडिओ येताच अवघ्या काही मिनिटातच या कमेंटचा पाऊस सुरू झाला आहे. निष्ठावंत म्हणून ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभेत राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. मात्र आता ऑपरेशन टायगरमध्ये ओमराजे यांच्या नावाची चर्चा आहे. त्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आले आहे.
आधी राजीनामा द्या..
ओमराजे पक्षातून फुटणार म्हटल्यावर धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामस्थांनी या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी अधिक खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर निवडून येऊन दुस-या पक्षात जावे, असा संताप गावकरी व्यक्त करत आहेत. नबाळकर यांच्या पडत्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना मोठ सहकार्य केले. आमदार केलं. खासदार केलं आणि आता ओमराजे वेगळे होत आहेत. त्यांचा निर्णय चुकीचा आहे, असं या गावक-यांनी म्हटलं आहे.
ओमराजेंवर दबाव आणला गेला ; राऊतांचा दावा
दुसरीकडे ओमराजे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक भाष्य केले आहे. ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या ड्रायव्हरची २० वर्षापूर्वी हत्या झाली होती. त्याचा निकाल काल होता. तो निकाल पुढे ढकलला आहे. वडिलांच्या हत्येचा निकाल बाजूने लावण्यासाठी ओमराजेंवर दबाव आणला गेला आहे, असे सूचक विधान राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
















